कौलापूरवाडाचे नवीन महसूल गाव म्हणून नोंद होणार
तीर्थकुंडयेत होते समाविष्ट : कौलापूरवाडावासियांची मागणी पूर्ण : ग्रामस्थांतून समाधान
खानापूर : तालुक्यातील बैलूर ग्राम पंचायत क्षेत्रातील कौलापूरवाडा हे गाव तीर्थकुंडये गावात गेल्या अनेक वर्षापासून समाविष्ट होते. ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून कौलापूरवाडा गाव वेगळे गाव म्हणून नोंद करून महसूल खात्याच्या सर्व कागदपत्रात बदल करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आले असून प्रांताधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली असून याबाबतचा अहवाल खानापूर तहसीलदारांनी वरिष्ठ पातळीवर कौलापूरवाडा हे तीर्थकुंड्यातून वगळून वेगळे गाव म्हणून नोंद करण्यासाठी अहवाल पाठविला होता. त्याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कौलापूरवाडा वेगळे गाव म्हणून नोंद करण्यासाठी आदेश दिल्याने कौलापूरवाडावासियांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील अतिशय दुर्गम भागात वसलेले कौलापूरवाडा गाव हे तीर्थकुंडये गावात समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे ग्राम पंचायत तसेच महसूल खात्यातील कागदोपत्रात तीर्थकुंडये गाव म्हणून नमूद होते. त्यामुळे कौलापूरवाडावासियांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या गावाचे वेगळे अस्तित्व आहे. गावची लोकसंख्या सहाशेच्यावर आहे. तसेच आठवीपर्यंत मराठी शाळा आहे. गावासाठी मोठ्या प्रमाणात शेती आहे. या गावात धनगर समाजाच्या लोकांची वस्ती आहे. मात्र या गावाची नोंद तीर्थकुंडयेत समाविष्ट असल्याने मूलभूत हक्क आणि शासकीय सुविधा मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी गावकऱ्यांनी वरिष्ठ पातळीपर्यंत कौलापूरवाडा गाव हे तीर्थकुंडयेतून वेगळे करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती.
तहसीलदारांना वेगळे महसूल गाव तयार करण्यास सूचना
महसूल खात्याच्या सचिवानी याबाबतचा अहवाल मागितला होता. त्याप्रमाणे खानापूर तहसीलदारांनी कौलापूरवाडा गावचे सर्वेक्षण करून कागदोपत्री अहवाल पाठविला होता. याची दखल घेऊन महसूल खात्याच्या सचिवानी प्रांताधिकाऱ्यांना याबाबत तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली होती. याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कौलापूरवाडा हे तीर्थकुंडयेपासून वेगळे महसूल गाव तयार करण्यास सूचना केली आहे. आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कौलापूरवाडा वेगळे महसूल गाव निर्माण होणार असल्याने कौलापूरवाडावासियांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी मान्य झाल्याने कौलापूरवाडा ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.