Vari Pandharichi 2025: कटावरी कर चंद्रभागा ठाणा
सासवड / ह.भ.प. अभय जगताप :
कटावरी कर चंद्रभागा ठाणा।
दावितसे खुणा भवसिंधूच्या ।।
पतिता कडसूत्र भाविका पायवाट।
दावी खुणा निकट तटी उभा ।।
भवसिंधूंची खोली ब्रह्मांड बुडे ऐसी ।
तळवा संतऋषी भिजती ना ।।
आषाढी कार्तिकी बोलाऊ धाडिती।
अनुभव जाणती ज्ञानराज ।।
विज्ञान तत्त्वबोधे कळले स्वधीये।
ब्रह्मानंद स्वये शेख महंमद ।।
शेख मोहम्मद हे मुस्लिम भगवद्भक्त संत तुकाराम महाराजांच्या समकालीन होते. त्यांनी अभंगरचने बरोबर योगासंग्राम सारख्या ग्रंथांची रचना केली आहे. वाहिरा हे त्यांचे जन्मस्थान तर श्रीगोंदा हे त्यांचे समाधीस्थान. या दोन्ही ठिकाणाहून त्यांच्या पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला येतात. या अभंगात पांडुरंगाचे वर्णन करताना सुरुवातीलाच मोहम्मद महाराजांनी देवाने कमरेवर हात का ठेवले आहेत, याचे स्पष्टीकरण दिले आहे. भव म्हणजे उत्पत्ती, सृष्टी अथवा संसार. आध्यात्मामध्ये भव पार करणे, हे एक आव्हान मानले आहे. या भवाला अनेकदा सागराची उपमा दिली जाते. हा भवसागर इतरांसाठी खोल असला तरी पांडुरंग भक्तांसाठी तो कमरे एवढाच आहे. भवसागराची खोली दाखवण्यासाठी देवाने कमरेवर हात ठेवले आहेत. जाणोनी भक्ता भवलक्षण। जघन प्रमाण दावतसे।। असे वर्णन ज्ञानेश्वर माउलींनीही केले आहे. पंढरपूरला येणाऱ्या पतितांसाठी हा भवसागर कमरेएवढा तर भाविकांसाठी जणू पायवाट असा आहे.
तुकोबारायांनी सुद्धा ‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। तरावया भवसागर रे’ असे वर्णन केले आहे. अर्थात इथे भवसागर करण्यासाठी सोपा असला तरी वास्तविक पाहता हा भवसागर ब्रम्हांड बुडेल इतका खोल आहे. पण, इथे येणाऱ्या या संतऋषींचा मात्र तळवा सुद्धा भिजत नाही.
आषाढी कार्तिकीला बोलावणे धाडले जाते. देव स्वत: भक्तांची वाट पाहत असतो. ‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज। सांगतसे गुज देवराय’ असे देवाचे सांगणे नामदेवरायांनी सांगितले आहेच. शिवाय सोपानदेवांसारखे संत सुद्धा चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीसी, असे आवाहन करत असतात.
देवाच्या या प्रेमाचा व भक्तांसाठी भवसागराची भीती नसण्याचा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांनी घेतलेला आहे. ज्ञान आणि विज्ञाना आधारे होणारा हा तत्व बोध करून आल्यामुळे शेख मोहम्मद स्वत: आत्मानंदांमध्ये मग्न झाले आहेत.