‘भाग्यवान’ कास्पारोव्हने आनंदवरील आघाडी वाढविली
वृत्तसंस्था/सेंट लुईस, अमेरिका
भारतीय स्टार विश्वनाथन आनंदने जुना प्रतिस्पर्धी गॅरी कास्पारोव्हविऊद्ध काही महत्त्वाच्या संधी गमावल्याने रशियाच्या त्या महान खेळाडूने येथे चालू असलेल्या क्लच चेस लिंजड्समधील बहुचर्चित सामन्याच्या उपांत्य दिवशी दोन विजय आणि तितक्याच बरोबरीसह आघाडी वाढवून पाच गुणांपर्यंत नेली. कास्पारोव्ह पहिला गेम जिंकण्याच्या बाबतीत भाग्यवान ठरला. कारण आनंद विजयाच्या जवळ पोहोचला होता. पण भारतीय खेळाडूला वेळ कमी पडला आणि तो घड्याळावर लक्ष ठेवण्यास विसरून गेला. दिवसाच्या दोन ब्लिट्झ सामन्यांपैकी कास्पारोव्हने पुन्हा पहिला गेम जिंकला आणि 1 लाख 44 हजार अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या लढतीच्या शेवटच्या दिवसापूर्वी 8.5-3.5 अशी आघाडी घेतली. 12 सामन्यांतील अजून चार सामने बाकी असताना नव्याने सादर केलेल्या स्वरूपामुळे आनंदचे आव्हान अजूनही संपलेले नाही. शेवटच्या दिवशी प्रत्येक विजय तीन गुणांचा असेल, तर बरोबरी 1.5 गुण देऊन जाईल.
सैद्धांतिकदृष्ट्या, आनंद बुद्धिबळ 960 स्वरूपातील या लढतीच्या शेवटच्या दिवशी दोन गेम जिंकून सामना जिंकू शकतो. ‘960 स्वरूपात’ लॉटच्या ड्रॉद्वारे सोंगाट्यांचे प्रारंभिक स्थान ठरविले जाते. तथापि, आनंद आतापर्यंत त्याच्या सर्वोत्तम लयीत दिसलेला नाही. आनंदसाठी हा पराभवाचा दिवस होता आणि कास्पारोव्हलाही अभिमान वाटेल असा हा दिवस नव्हता. जर आनंद जवळजवळ जिंकलेल्या स्थितीत वेळेबद्दल विसरला नसता, तर जगात एकेकाळी अव्वल क्रमांकावर राहिलेला कास्पारोव्ह पहिला गेम सहज गमावून बसला असता. ‘पहिल्या गेममध्ये मी एका क्षणी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक मिनिट, 26 सेकंद होते आणि नंतरची स्थिती मला माहीत नाही. मी पुन्हा घड्याळाकडे पाहायला हवे होते. मी पूर्णपणे विसरलो’, असे आनंदने लढतीनंतर सांगितले. दुसऱ्या गेममध्ये चुरसपूर्ण बरोबरी पाहायला मिळाली. परंतु आनंदने तिसरा गेम गमावला. या दिवशी प्रत्येक विजय दोन गुण देऊन जात असल्याने कास्पारोव्हला पाच गुणांची आघाडी मिळाली. हा सामन्यातील सर्वांत कमी वेळ चाललेला गेम होता आणि तो फक्त 18 चाली चालला. आनंदसाठी परिस्थिती आणखी बिकट झाली असती. परंतु दिवसाच्या शेवटच्या ब्लिट्झ गेममध्ये कास्पारोव्हने फारसा जोर लावला नाही.