न्यायालयाच्या निर्णयामुळे काश्मीर प्रश्न चिघळणार : इम्रान
अनुच्छेद 370 चा मुद्दा : काश्मिरींना मदत करत राहू
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अनुच्छेद 370 वर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काश्मीर प्रश्न अधिक चिघळणार असल्याचे म्हटले आहे. काश्मीरसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय वादग्रस्त तसेच कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे दशकांपासून चालत आलेला प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा ठरणार असल्याचा दावा इम्रान यांनी केला आहे.
मी आणि माझा पक्ष काश्मीरच्या लोकांना राजनयिक, राजकीय आणि नैतिक मदत पुरवत राहणार आहे. काश्मीर हाच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचे मूळ आहे. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर आम्ही तीव्र विरोध केला होता असे इम्रान यांनी म्हटले आहे.
आम्ही आमच्या देशांच्या हितसंबंधांना प्राथमिकता देत भारतासोबत चांगले संबंध निर्माण करू इच्छित होतो. परंतु 5 ऑगस्ट 2019 रोजी अनुच्छेद 370 हटल्यावर असे करणे अशक्य ठरले. आम्ही काश्मीरच्या लोकांच्या आकांक्षांशी तडजोड करू शकत नसल्याचे वक्तव्य इम्रान यांनी केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळापासून काश्मीरसंबंधी वाद राहिला आहे. हा वाद शांततापूर्ण मार्गाने सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांच्या अंतर्गत सोडविला जाणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी चर्चेद्वारे हा वाद सोडवावा असे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे सायफर प्रकरणी तुरुंगात कैद आहेत. तर त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरैशी हे गुप्त पत्र चोरी प्रकरणी दोषी ठरल आहेत.