पाकिस्तानच्या 16 अणुतज्ञांचे अपहरण
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेवर संशय
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानच्या 14 अणुशास्त्रज्ञांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या देशाला मोठाच धक्का बसला आहे. हे अपहरण अफगाणिस्तानशी संबंधित असणाऱ्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने केले, हे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी 16 अणुशास्त्रज्ञांचे अपहरण घडण्याचा हा जगाच्या इतिहासातील आतापर्यंतचा प्रथम प्रसंग असल्याचे मानले जात आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत असून तिचा संबंध अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाशी जोडला जातो. या संघटनेने एक व्हिडीओ प्रसारित केला असून त्यात हे सर्व अपहृत शास्त्रज्ञ दिसत आहेत. आपली सुरक्षा सुनिश्चित करा, अशी विनवणी ते पाकिस्ताच्या प्रशासनाला करत असल्याचे या व्हिडीओत दिसून येते. या व्हिडीओची सत्यता तपासली जात आहे. मात्र, 16 अणुशास्त्रज्ञ अपहृत झाले आहेत, ही बाब पाकिस्तानने मान्य केली असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.
सर्वजण इंजिनिअर्स
हे 16 अपहृत अणुतज्ञ इंजिनिअर्स असून ते पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे कर्मचारी आहेत. ते क्लाबूल खेल येथील एका अणुद्रव्य खाण प्रकल्पावर काम करीत होते. हे क्षेत्र डेरा इस्माईल खान येथील लक्की मेवात येथे स्थित आहे. या इंजिनिअर्सना आम्ही पकडले असून त्यांना धोका पोहचविण्याचा आमचा हेतू नाही. पाकिस्तानने आमच्या मागण्या मान्य केल्यास त्यांची सुटका केली जाईल. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या सदस्यांच्या विरोधात पाकिस्तानी लष्कराने त्याची कारवाई थांबवावी, अशी आमची मागणी असून ती पाकिस्तानने मान्य करावी, असा संदेश या संघटनेने पाकिस्तानच्या प्रशासनाला दिला आहे. अपहृत अणुतज्ञांची नावे पाकिस्तानने अद्याप उघड केलेली नाहीत.
युरेनियमची लूट
पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या युरेनियम खाणीतून बाहेर काढण्यात आलेले युरेनियमही या संघटनेने लुटल्याचे वृत्त आहे. अणुबाँब तयार करण्यासाठी संपृक्त युरेनियमची आवश्यकता असते. पाकिस्तानच्या डेरा इस्लाईल खान क्षेत्रात युरेनियमच्या काही खाणी आहेत, अशी माहिती देण्यात आली. या खाणीतून युरेनियमचे खनिज बाहेर काढण्याचे काम हे अणुतज्ञ करीत होते.
पाकिस्तान-तालिबान तणाव
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सत्ताधीश संघटना तालिबान यांच्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. याच संघर्षातून हे अणुतज्ञांचे अपहरण करण्यात आले असावे, असा तर्क आहे. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर संघर्ष होत असून तो केव्हाही युद्धात परिवर्तित होऊ शकतो, अशी स्थिती आहे. अफगाणिस्ताच्या काही खेड्यांवर पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी विमानाने बाँबफेक करुन 46 अफगाणींना ठार केले होते. ठार झालेले सर्व निरपराध नागरिक होते. त्यांच्यात महिला आणि मुलांचे प्रमाण मोठे होते, असे अफगाण तालिबानचे म्हणणे आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी 15 हजार सैनिक सज्ज ठेवले असून ते सातत्याने सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले करीत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले असल्याचे बोलले जाते. अनेक पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाल्याने त्या तालिबानच्या हाती लागल्या आहेत. सीमेच्या निर्धारणावरुन हा संघर्ष होत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा अफगाणिस्तानला मान्य नाही. पाकिस्तानच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पाकिस्तानच्या प्रदेशावर अफगाणिस्तानने गेल्या अनेक दशकांपासून दावा केला आहे त्यातूनच हा संघर्ष निर्माण झाला आहे.
अपहरणामुळे चिंतेचे वातावरण
- पाकिस्तानच्या अणुतज्ञांच्या अपहरणामुळे त्या देशात चिंतेचे वातावरण
- सर्व अपहृत पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे इंजिनिअर्स असल्याचे स्पष्ट
- डेरा इस्लाईल खान भागात युरेनियम खनन प्रकल्पावरुन त्यांचे अपहरण