For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीर-दिल्ली ‘टेरर लिंक’

06:10 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
काश्मीर दिल्ली ‘टेरर लिंक’
Advertisement

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटाला एक महिना उलटून गेला आहे. परंतु दहशतवादी कटातील मुख्य खटला अद्याप न्यायालयात सुरू झालेला नाही. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 20 हून अधिक जखमी झाले. सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तपास हाताळल्यानंतर 18 नोव्हेंबरला गृह मंत्रालयाने तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला. एनआयएने आतापर्यंत सात प्रमुख आरोपींना अटक केली असून त्यात कथित मास्टरमाईंड आणि स्फोटके मिळविणाऱ्यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या एनआयएच्या ताब्यात आहेत. तथापि पटियाला हाऊस न्यायालय सध्या आरोपींच्या रिमांड वाढ आणि जामीन अर्जांवर सुनावणी करत आहे. आतापर्यंतच्या तपासात काश्मीर आणि दिल्ली यांच्यातील ‘टेरर लिंक’ उघड झाली असून आता आंतरराष्ट्रीय संबंध आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे सरकताना दिसत आहे.

Advertisement

10 नोव्हेंबर रोजी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासातून आता फरिदाबाद येथील व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा कट पूर्णपणे उघड झाला आहे. या मॉड्यूलचे नियोजन अत्यंत धोकादायक होते. एनआयएने काश्मीरमध्ये सुरू झालेल्या अल-फलाह विद्यापीठ आणि नूहमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचलेल्या स्फोटांमागील संपूर्ण कट उलगडला आहे.

तपास पथकाने या मॉड्यूलच्या संपर्कात असलेल्या 1,000 हून अधिक लोकांची चौकशी केली. आतापर्यंतच्या तपासात हे मॉड्यूल आत्मघाती बॉम्बर तयार करण्यासाठी, ड्रोन हल्ले करण्यासाठी आणि अगदी लोन वुल्फ हल्ले करण्यासाठी तयार केले जात असल्याचे आढळले आहे. याचा अर्थ असा की एकाच नेटवर्कद्वारे विविध प्रकारच्या हल्ल्यांचे नियोजन केले जात होते.

Advertisement

दिल्ली स्फोटातील मॉड्यूलची मुळे काश्मीरमध्ये स्थापित झाली होती आणि त्यानंतर फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ परिसर त्याचे ऑपरेशन्स आणि नियोजन केंद्र बनविण्यात आले. त्याचवेळी या मॉड्यूलमध्ये डॉक्टरांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्फोटके तयार करणे आणि स्फोट घडविण्याचे काम शास्त्रोक्त पद्धतीने करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

फरिदाबाद-नूह कनेक्शन

फरिदाबाद मॉड्यूलने अल-फलाह विद्यापीठाच्या परिसरात एक लॉजिस्टिक्स आणि स्टोअरेज सेंटर स्थापन केले. याचवेळी नूह (मेवात) जिह्यात स्फोटके एकत्र करण्यासाठी आणि लपविण्यासाठी स्लीपर सपोर्ट मिळविण्याची योजना आखली. फरिदाबाद आणि नूहमधील ठिकाणांची झालेली ही निवड अतिशय सूक्ष्मपणे केलेली दिसते. हरियाणातील हे दोन्ही जिल्हे दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे, कुंडली मानेसर एक्स्प्रेस वे आणि दिल्ली-आग्रा महामार्ग, दिल्ली-एनसीआर आणि इतर ऐतिहासिक शहरांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. वाहतूक तपासणीदेखील कमी आहे. विद्यापीठाच्या मशिदीतील मौलवी इश्तियाकचा सहभाग आणि त्यानंतर डॉ. उमर यांचे नूहमध्ये लपणे हे या धोरणाचा भाग असल्याचे मानले जाते.

महिला दहशतवादी नेटवर्क

फरिदाबाद मॉड्यूलच्या व्हाईट कॉलर दहशतवादी गटाने विद्यापीठाचा आधार म्हणून वापर करून पहिले व्यावसायिक महिला दहशतवादी नेटवर्क स्थापन करण्याची योजना आखली होती. डॉ. शाहीन सईदला या नेटवर्कची प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आली होती. या अंतर्गत विद्यार्थी, महिलांचे ब्रेनवॉश करून आयईडी असेंब्ली, टोही आणि आत्मघाती हल्ल्यांसाठी तयार करायचे होते, असेही आजपर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

‘जैश-ए-मोहम्मद’शी साधर्म्य

जैश-ए-मोहम्मदने यावर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये जमात-उल-मोमिनतची स्थापना करत मसूद अझहरची मेहुणी सादिया अझहर हिला या संस्थेची प्रमुख म्हणून नियुक्त केले. या संघटनेत त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना भरती केले. त्याचप्रमाणे भारतात ही कल्पना अंमलात आणण्याची जबाबदारी डॉ. शाहीन सईद हिला देण्यात आली होती.

हजारहून अधिक लोकांची चौकशी

10 ऑक्टोबरला झालेला स्फोट आणि त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी काश्मीरमध्ये पोस्टर सापडल्यापासून तपास संस्थांनी सुमारे 400 ठिकाणी शोध घेतला. या दरम्यान 1,000 हून अधिक लोकांची चौकशी केली. तपासादरम्यान 73 साक्षीदारांची कसून चौकशी करत फरिदाबाद मॉड्यूलची पुष्टी केली. त्याचबरोबर अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित 200 लोकांनाही ताब्यात घेत चौकशीचक्र जोरदार फिरविल्यामुळे तपास यंत्रणांना मौल्यवान माहिती मिळाली.

      फरिदाबाद मॉड्यूलचा धोकादायक कट...

सीरियल आयईडी स्फोट : या मॉड्यूलने 2,900 किलो अमोनियम नायट्रेटपासून 200 आयईडी तयार केले होते. दिल्ली-एनसीआरमध्ये स्फोटांची मालिका घडविण्याची योजना आखली होती. या हल्ल्यांतून 26/11 प्रमाणेच जास्तीत जास्त जीवितहानी करण्याचे लक्ष्य होते.

आत्मघाती बॉम्बस्फोट : डॉ. उमर उन नबी यांसारख्या डॉक्टरांचा आत्मघाती हल्ले करण्यासाठी ‘बॉम्बर’ म्हणून वापर करण्यात येणार होता. डॉ. उमर हा एक प्रशिक्षित बॉम्बर होता. काश्मीरमधून थेट दिल्लीच्या लाल किल्ला परिसरापर्यंत जात त्याने दहशतवादी हल्ला घडविला होता.

हमास-शैलीचा ड्रोन हल्ला : मॉड्यूलमधील हँडलर्सच्या सांगण्यावरून ड्रोनमध्ये स्फोटके बसवून हल्ला करण्याचेही नियोजन होते. जसीर बिलाल वानी सारख्या तांत्रिक तज्ञांना मास्टर ट्रेनर बनण्यासाठी अशाप्रकारे प्रशिक्षण द्यायचे होते. इतर सदस्यांना प्रशिक्षण देण्याचीही तयारी होती.

कार बॉम्ब योजना : नियोजनाच्या अंतिम टप्प्यात 32 नवीन किंवा सेकंड-हँड कारमध्ये आयईडी बसवून हल्ले करण्याचे नियोजन होते. तूर्तास चार कार खरेदी करण्यात आल्या. अल-फलाह विद्यापीठातून मिळालेल्या डॉक्टरांच्या डायरी डी-कोड करून ही माहिती मिळविण्यात आली.

लोन वुल्फ अटॅक : हँडलरने आत्मघाती बॉम्बस्फोटांसह लोन वुल्फ अटॅकसाठी काहीजणांना प्रशिक्षित करण्याची तयारी केली होती. त्यानुसार डॉक्टरांनाही

प्रशिक्षण देण्यात आले होते. ही मॉड्यूलची बॅकअप स्ट्रॅटेजी होती. एकट्याने स्फोट घडविताना त्याची व्यापकता वाढविण्याचा विचार होता.

तपास होणार... तोही सखोल : एनआयए

कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यासाठी साधारणपणे 90 दिवसांची मुदत दिली जात असल्यामुळे तपास यंत्रणांकडे आणखी किमान दोन महिने आहेत.  दिल्लीतील स्फोट हा एका व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा कट असल्याचा दावा एनआयएने केलेला आहे. या कारस्थानात काश्मीर आणि फरिदाबादमधील डॉक्टर आणि धार्मिक व्यक्तींचे नेटवर्क पुरते गढून गेले होते. स्फोटात वापरलेले हुंडाई आय 20 हे वाहन अमोनियम नायट्रेटने भरलेले होते. डॉ. उमर उन नबी हा मुख्य संशयित पुलवामा येथील रहिवासी होता. या आत्मघाती बॉम्बरने देशात हाहाकार माजवण्याच्या नादात दहशतवादी नेटवर्कच्या जाळ्यात अडकून स्वत:ला संपवले. या संपूर्ण घटनाक्रमातून दहशतवाद्यांनी व्यापक जाळे विणल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच तपासात परदेशी हँडलर्सशी संबंधदेखील उघड झाले आहेत. साहजिकच सद्यस्थिती तपासातील विलंबामुळे मृतांच्या कुटुंबियांमध्ये नाराजी असली तरी आतापर्यंत झालेला तपास धीम्यागतीने चाललाय असे मुळीच म्हणता येणार नाही.

न्यायाच्या दरबारात काय-काय घडले?

17 नोव्हेंबर : एनआयएने कारचा नोंदणीकृत मालक आणि जम्मू काश्मीरमधील पंपोर येथील रहिवासी असलेल्या अमीर रशीद अलीला अटक केली. न्यायालयाने त्याला 10 दिवसांची एनआयए कोठडी दिली. अमीरने डॉ. उमर नबीसोबत कट रचला होता असे तपासात दिसून आले.

20 नोव्हेंबर : डॉ. मुझम्मिल शकील गनई (पुलवामा), डॉ. अदील अहमद राथेर (अनंतनाग), डॉ. शाहीन सईद (लखनौ) आणि मौलवी इरफान अहमद वागे (शोपियान) या चार प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली. हे सर्वजण व्हाईट कॉलर मॉड्यूलचे कथित सदस्य होते. न्यायालयाने त्या प्रत्येकाला 10 दिवसांची कोठडी दिली.

26 नोव्हेंबर : फरिदाबाद येथील रहिवासी उमरला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या सोयब अली आणि अमीर रशीद अली यांना न्यायालयात हजर करण्यात आले. व्यापक नेटवर्क उघड करण्यासाठी एनआयएने कोठडी मागितली.

27 नोव्हेंबर : अनंतनाग येथील रहिवासी आणि ड्रोन मॉडिफिकेशनमधील सहकारी जसीर बिलाल वाणी यांना 7 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली. वाणीने रॉकेट तयार करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

29 नोव्हेंबर : चार डॉक्टर आणि मौलवी यांच्या कोठडीत 10 दिवसांची वाढ करण्यात आली.

3 डिसेंबर : दिल्ली उच्च न्यायालयाने खटल्याच्या देखरेखीसाठी न्यायालयीन समिती स्थापन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. जसीर बिलाल वाणी याची कोठडी 7 दिवसांनी वाढवण्यात आली.

5 डिसेंबर : सोयब अलीची कोठडी 10 दिवसांनी वाढविण्यात आली.

8 डिसेंबर : मुझम्मिल गनई, अदील राथेर, शाहीन सईद आणि मौलवी इरफान यांची कोठडी 4 दिवसांनी वाढविण्यात आली.

9 डिसेंबर : एनआयएने आरोपी अमीर रशीद अली याची कोठडी 7 दिवसांनी वाढवली. बिलाल नासीर मल्ला या नवीन आरोपीलाही सात दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले.

12 डिसेंबर : या प्रकरणातील तीन डॉक्टरांसह पाचजणांची 12 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

केंद्र काश्मीर... लक्ष्य दिल्ली... व्हाया हरियाणा

महिन्यानंतरही तपास-अटक-कोठडी सुरुच

दिल्ली बॉम्बस्फोटांचे नियोजन काश्मीरमध्येच

तयारीसाठी अल-फलाह विद्यापीठाची निवड

टेरर मॉड्यूलद्वारे उमर बनला आत्मघाती बॉम्बर

जयनारायण गवस

Advertisement
Tags :

.