For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात अझरबैजान अध्यक्षांकडून काश्मीर राग

06:32 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात अझरबैजान अध्यक्षांकडून काश्मीर राग
Advertisement

युएनएससी प्रस्तावाचा आळवला सूर : आर्मेनिया-भारत मैत्रीमुळे जळफळाट

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर पोहोचलेले अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव्ह यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा सूर आळवला आहे. त्यांनी काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केल आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचा उल्लेख केला. यादरम्यान त्यांनी भारताचा नामोल्लेख टाळून काश्मिरींच्या अधिकारांकडे दुर्लक्ष अन् उल्लंघन होत असल्याचा दावा केला.

Advertisement

अलीयेव्ह यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानचे पहिल्यांदाच समर्थन केलेले नाही. परंतु प्रत्येकवेळी भारताने अझरबैजानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत-आर्मेनिया मैत्रीमुळे जळफळाट होत असल्यानेच अलीयेव्ह हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचून काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तान आणि अझरबैजान यांच्यात बंधुत्वाचे नाते आहे. आम्ही बंधू आणि मित्र आहोत. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक आंतरराष्ट्रीय संस्थेत परस्परांचे समर्थन करतो. आमच्या प्रस्तावाचे पाकिस्तानने समर्थन केले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर आमचे थेट समर्थन आमच्या बंधुत्वाप्रती आमची प्रतिबद्धता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दलचा आमचा आदर आहे. दशकांपासून काश्मिरींच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याचे अलीयेव्ह यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांमध्ये हा मुद्दा कशाप्रकारे निकालात काढावा हे स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. परंतु दुर्दैवाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी कुठलीच व्यवस्था नाही. परंतु आम्ही आमच्या भाऊ आणि मित्रासोबत, काश्मीरच्या आमच्या बांधवांसोबत, आंतरराष्ट्रीय कायद्यांसोबत उभे राहू आणि न्यायाचा विजय होईल असा मला विश्वास असल्याचे अझरबैजानच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने नेहमीच अझरबैजानला मदत केली आहे. दुसऱ्या काराबाख युद्धादरम्यान पाकिस्तानने मदत केल्याचे अझरबैजानचे लोक जाणून असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात नागार्नो-काराबाख या भूभागावरून मागील काही वर्षांमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. या संघर्षात अझरबैजानला तुर्किये, इस्रायल आणि पाकिस्तानने मदत केली आहे. तर आर्मेनियाला भारत आणि फ्रान्सने बळ पुरविले आहे.

Advertisement
Tags :

.