काशी विश्वेश्वर आणि सामाजिक सौहार्द
रामजन्मभूमी प्रकरणाचा अंत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने झाल्यानंतर आता वाराणसी येथील काशी विश्वेश्वराच्या मंदिराचे प्रकरणही न्यायालयात पोहचले आहे. रामजन्मभूमीपेक्षा याचे स्वरुप भिन्न असले तरी, यातही न्यायालयाबाहेर हिंदू आणि मुस्लीम असाच मुद्दा आहे. वाराणसी येथील न्यायालयाने काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश दिल्यानंतर हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा अहवालही न्यायालयाच्या आधीन करण्यात आला आहे. अहवालात नेमके काय स्पष्ट करण्यात आले आहे, याची अधिकृत माहिती बाहेर आलेली नसली, तरी या मशिदीच्या अंतर्भागात हिंदू मंदिराच्या खाणाखुणा स्पष्टपणे दिसून येतात. तसेच सर्वेक्षणात काही हिंदू देवतांच्या मूर्ती, शेषनाग, कमलपुष्प, हिंदू पद्धतीचे कोरीवकाम, भिंतींवर हिंदू पद्धतीची चित्रे आणि नक्षी आदी बऱयाच बाबी आढळून आल्या आहेत, असे अहवालात नोंद करण्यात आल्याचे प्रतिपादन पेले जात आहे. शिवाय मशिदीच्या बाहेरच्या तलावात भव्य आकाराचे शिवलिंग सापडल्याचेही हिंदू पक्षाचे प्रतिपादन आहे. न्यायालयाला सादर करण्यात आलेला अहवाल उघड झाल्यानंतर याची सत्यता समजणार आहे. हा मुद्दा आता मोठय़ा प्रमाणात चर्चेचा विषय झाल्याने त्याचे सर्वंकष विश्लेषण करणे योग्य ठरणार आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा विचार करता, साधारणतः साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने वाराणसी येथील मंदीर पाडवून तेथे मशीद उभी करण्याचा आदेश दिला होता असे दिसून येते. त्याहीपूर्वी हे मंदीर किमान तीन वेळा मुस्लीम आक्रमकांकडून तोडण्यात आले होते. मात्र, प्रत्येकवेळी त्याचे हिंदूंकडून पुनर्निर्माण करण्यात आले. साधारणतः सव्वादोनशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्याचे पुननिर्माण केल्याची नोंद इतिहासात आहे. सध्या काशी विश्वेश्वराचे मंदीर आणि ‘ज्ञानवापी’ या नावाने ओळखली जाणारी मशीद एकाच परिसरात आहेत. ज्ञानवापी हे संस्कृत नाव या मशिदीला कसे मिळाले असाही प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्याची वेगवेगळी कारणे नोंद आहेत. पाडवलेल्या शिवमंदिराचीच साधनसामग्री उपयोगात आणून मशीदीची बांधणी केली आहे, असेही अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे. तसे पाहिल्यास ही परिस्थिती अनेक स्थानी आहे. मध्ययुगात मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे पाडवून त्यांच्या जागी आणि पाडविलेल्या मंदिराचीच सामग्री उपयोगात आणून मशिदी उभ्या केल्याची उदाहरणे कित्येक हजारांच्या संख्येने असल्याचे काही इतिहासकारांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यापैकीच एक ज्ञानवापी मशीद आहे, यासंबंधी इतिहासाकारांमध्ये एकमत दिसून येते. आता मुख्य प्रश्न असा आहे, की अशा मशिदींसंबंधी जे वाद आजच्या काळात उपस्थित पेले जात आहेत, ते योग्य आहेत काय ? इतिहासाच्या घडय़ाळाचे काटे मागे फिरवता येतील काय ? तसे करण्याने काय साध्य होणार आहे ? महागाई, बेरोजगारी असे वर्तमानकालीन प्रश्न उभे असताना लोकांना अशा भावनात्मक आणि धार्मिक प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवणे योग्य आहे काय ? विशेषतः असे प्रश्न स्वतःला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱया कथित विचारवंतांकडून वारंवार उपस्थित केले जातात. त्यामुळे या प्रश्नांची वैधता आणि सयुक्तीकता तपासणे आवश्यक आहे. वरकरणी हे प्रश्न बिनतोड वाटतात. कारण, सर्वसामान्य माणूस इतिहासात जगू शकत नाही. त्याला वर्तमानातच जगावे लागते आणि वर्तमान काळातील परिस्थिती हाच त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा असतो. तथापि, ‘भावना’ हा माणसाच्या जीवनातील एक महत्वाचा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा पैलू आहे हे निर्विवाद आहे. या भावनेमुळेच तर माणूस इतर प्रजातींमधील प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ‘स्वाभिमान’ आणि ‘अस्मिता’ हा माणसाच्या जगण्याचा आणि सन्मानाचा मूलाधार आहे हे नाकारता येत नाही. माणूस हा केवळ आर्थिक चारापाण्यावर गुजराण करु शकत नाही. अर्थकारणाचे महत्व निश्चित आहे, पण तेच माणसाचे सर्वस्व असू शकत नाही. याच अस्मितांमध्ये धार्मिक अस्मितांचाही समावेश असतोच असतो. ही अस्मिता प्रत्येक धर्माच्या लोकांनी योग्य वेळी दाखविली आहे आणि इतिहास काळात झालेल्या अन्यायांचे परिमार्जनही वर्तमानकाळात शक्य तितक्या प्रमाणात करुन घेतले आहे. ज्यावेळी स्पेन या देशात मुस्लीमांची सत्ता होती तेव्हा अनेक चर्चेसचे रुपांतर मशिदींमध्ये करण्यात आले होते. पुढे मुस्लीम सत्ता स्पॅनिश लोकांनी झुगारुन दिली आणि नंतर या मशिदींचे पुन्हा चर्चेसमध्ये रुपांतर करण्यात आले. असे करुनही स्पेन देश आजही ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणूनच ओळखला जातो. रशियात जेव्हा साम्यवादी सत्ता लयाला गेली तेव्हा आधुनिक रशियाचा शिल्पकार म्हणून मानल्या गेलेल्या जोसेफ स्टॅलिन यांचे पुतळे तेथील लोकांनीच तोडून टाकले आहेत. ही सर्व उदाहरणे इतिहासकाळातील अन्यायाच्या निराकरणाचीच नाहीत काय ? आपल्याकडेही सामाजिक न्याय या संकल्पनेअंतर्गत जी आरक्षणादी धोरणे आहेत, ती विशिष्ट समाजघटकांवर इतिहास काळात झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनाशीच निगडीत आहेत. तेव्हा, परकीय आक्रमकांनी जे अन्याय भारतातील जनतेवर केले, त्यांपैकी ज्या अन्यायांचे परिमार्जन शक्य आहे, ते वर्तमानकाळात झाल्यास सामाजिक सौहार्दाचे वातावरण अधिक चांगल्या प्रकारे निर्माण पेले जाऊ शकते. म्हणून दोन्ही बाजूंनी मंदीर-मशिदींचा इतिहास नेमका काय आहे हे समजून घेतल्यास, तसेच एकमेकांशी सहकार्य केल्यास बऱयाच समस्या सुटू शकतात. सामाजिक सौहार्द हे केवळ एकाच समाजाचे (विशेषतः हिंदू समाजाचे) उत्तरदायित्व आहे, असे मानणे हा पक्षपात असून तो याच सामाजिक सौहार्द या संकल्पनेला घातक आहे, याची जाणीव सर्व संबंधितांनी ठेवणे आवश्यक आहे. हिंदूंची मंदिरे पाडवून ज्या मशिदी उभ्या करण्यात आल्या आहेत, त्या इस्लामसंमत नाहीत, असे वक्तव्य मुस्लीम समाजातील अनेक मान्यवर करीत आहेत. त्यांचेही महत्व ओळखले पाहिजे आणि शक्यतोवर अशी प्रकरणे न्यायालयात न नेता, दोन्ही समाजांमधील जबाबदार संस्था व व्यक्तींनी एकत्र येऊन ‘अन्यायाचे परिमार्जन’ या संकल्पनेच्या चौकटीत सोडविल्यास ते एक सामाजिक सलोख्याचे आदर्श उदाहरण ठरेल.