गणरायाच्या विसर्जनासाठी कारवार तालुका सज्ज
रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर गणेश मूर्तींचे होणार विसर्जन
कारवार : उद्या दि. 28 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी कारवार तालुका सज्ज झाला आहे. काही अपवाद वगळता घरगुती गणरायांचे यापूर्वीच विसर्जन केले आहे. शिवाय काही शासकीय कार्यालयातील गणरायांचेही यापूर्वीच विसर्जन केले आहे. त्यामुळे आता शहरातील सार्वजनिक मंडळाच्या व ग्रामीण भागातील श्रींच्या मूर्तीचे आज विसर्जन होणार आहे. गणरायाच्या आगमनापासून आज अखेर श्रींची मोठ्या भक्भावाने पूजा अर्चा केली. सार्वजनिक मंडळांनी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच महापूजा, महाप्रसादाचे आयोजन केले होते. येथील विसर्जन मिरवणूक ही वैशिष्ट्यापूर्ण असते. कारवार शहरातील काही श्रींच्या मूर्तींचे येथील रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर काही मूर्तींचे बैतखोल येथील समुद्रकिनाऱ्यावर तर काही मूर्तींचे काळी नदीत विसर्जन केले जाते. येथून जवळच्या सदाशिवगड येथील बाजारपेठ आणि शिवाजी चौकातील श्रींचे विसर्जन काळी नदीत केले जाते. ग्रामीण प्रदेशातील काही मूर्तींचे मावीनओहोळमध्ये विसर्जन केले जाते. आज बुधवारी श्रींचे दर्शन घेण्यासाठी आणि देखाव्यांचा व विद्युत रोषणाईचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.