कारवारचे आमदार सतीश सैल दोषी
बेलकेरी बंदरावरील खनिज बेपत्ता प्रकरण : न्यायालय आज शिक्षा ठोठावणार
बेंगळूर, कारवार : कारवारच्या बेलकेरी बंदरावरील खनिज बेपत्ता प्रकरणात कारवारचे काँग्रेस आमदार सतीश सैल सर्व सहा प्रकरणांमध्ये दोषी ठरले आहेत. बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने हा आदेश दिला असून शिक्षा शुक्रवारी सुनावली जाणार आहे. शिवाय न्यायालयाने सर्व दोषींना ताब्यात घेण्याची सूचना दिल्याने सीबीआयने न्यायालय आवारातच सतीश सैल यांना ताब्यात घेतले. बेलकेरी बंदरावरील 11,312 मेट्रीक टन खनिजाची परवानगीशिवाय वाहतूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. यासंबंधी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी वाद-प्रतिवाद ऐकून सर्व आरोपींना दोषी ठरविले. न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी वनाधिकारी महेश बिळीये, मल्लिकार्जुन शिपिंग कंपनी आणि आमदार सतीश सैल यांना दोषी ठरविले आहे. शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता शिक्षा ठोठावण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, शिक्षेचे स्वरुप काय?, कोणत्या निकषांच्या आधारावर शिक्षा देण्यात आली आहे? हे गुरुवारीच समजणार आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी...
2010 मध्ये बळ्ळारी येथून लोहखनिजाची वाहतूक करून बेलकेरी बंदरामार्फत विदेशात निर्यात केली जात होती. येथील खनिजाची बेकायदा वाहतूक झाल्याचे प्रकरण तत्कालीन लोकायुक्त एन. संतोष हेगडे यांनी उजेडात आणले. त्यांनी दिलेल्या अहवालात 7.74 दशलक्ष टन लोहखनिजाची विदेशात निर्यात झाली होती. 2006-07 आणि 2010-11 दरम्यान मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे विदेशात खनिज वाहतूक झाली. यामुळे सरकारच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाले होते. मल्लिकार्जुन शिपिंग कार्पोरेशनचे मालक सतीश सैल यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, फसवणूक, अतिक्रमण या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करून सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. 2013 मध्ये या प्रकरणी बीएसआर काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार सुरेश बाबू यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर सतीश सैल यांनाही गजाआड करण्यात आले होते.
न्यायालय आवारातच आरोपी ताब्यात
बेलकेरी बंदरावरील खनिज बेपत्ता प्रकरणासंबंधी सीबीआयने तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने निकाल देताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आमदार सतीश सैल यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाच्या आवारात ताब्यात घेतले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात नेण्यात आल्याचे समजते.