निवडणुकीसाठी कारवार जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : गैरव्यवहार रोखण्यासाठी 25 तपासणी नाके
कारवार : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक 7 मे रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात लोकसभा निवणुकीचे 12 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल तर 20 एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात कारवार जिल्ह्यातील 12 तालुक्यातील कारवार, कुमठा, भटकळ, हल्याळ, यल्लापूर व शिरसी आणि बेळगाव जिल्ह्यातील खानापूर व कित्तूर अशा 8 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीच्यावेळी होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्ह्यात एकूण 25 तपासणी नाके राहणार आहेत. या नाक्यावर सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन व्हावे या उद्देशाने भरारी पथक, सेक्टर अधिकारी, व्हिडिओ आदी पथकांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 15 हजार 599, महिला मतदारांची संख्या 8 लाख 7 हजार 242 तर अन्य लिंग मतदारांची संख्या 16 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या 1977 आहे.
2 हजार 489 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती
याप्रसंगी कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एस. विष्णूवर्धन म्हणाले, जिल्ह्यातील 2 हजार 489 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश राजपूत, कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी ईश्वर कांदू उपस्थित होते.