कारवार समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान
आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या सूचनेची जिल्हाधिकाऱ्यांकडून त्वरित दखल
कारवार : येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावरील अस्वच्छता आणि प्रदूषणासंदर्भात माजी मंत्री आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी असमाधान आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर कारवार जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. कारण रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी दाखल होऊन कचरा फेकून प्रदूषणाला जबाबदार ठरणाऱ्या पर्यटकांकडून दंड वसूल करण्याची सूचना कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी कारवार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. आर. व्ही. देशपांडे हे नुकतेच कारवारच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. शिवाय त्यांनी जलपर्यटनाचा आनंद लुटला. किनाऱ्यावरील फेरफटक्यावेळी त्यांना प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग दिसून आले. कचऱ्यामुळे किनाऱ्यावर अस्वच्छताही त्यांना दिसून आली. त्यांनी त्वरित जिल्हाधिकारी मानकर यांना फोन केला आणि किनाऱ्यावरील दुर्दशेची माहिती दिली. आणि केवळ कारवार किनाऱ्यावरच नव्हेतर जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायाचा विकास घडवून आणण्याचा सल्ला दिला. देशपांडे यांच्या फोननंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकारी मानकर यांनी नगरपालिकेतर्फे रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर ‘आमचे कारवार स्वच्छ कारवार’ हे अभियान हाती घेऊन किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली.
कचरा फेकणाऱ्यांकडून दंड वसूल करणार
याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगंबाई मानकर म्हणाल्या, कारवारमधील प्रमुख पर्यटनस्थळ बनून राहिलेल्या रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असतात. येताना पर्यटक प्लास्टिक आणि अन्य वस्तु सोबत आणतात. वापर केलेल्या वस्तू नंतर किनाऱ्यावरच फेकून दिल्या जातात. त्यामुळे अस्वच्छता आणि प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे यापुढे कचरा फेकणाऱ्या पर्यटकांकडून दंड वसूल करण्याची सूचना नगरपालिकेला केली असल्याचे सांगितले.
- जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर