करवे कार्यकर्त्यांचा मनपात धुडगूस
शुभेच्छा फलकांवर कन्नडला स्थान न दिल्याने तिळपापड
बेळगाव : ईद ए मिलाद मिरवणुकीवेळी महापालिकेकडून केवळ ऊर्दू आणि इंग्रजी भाषेतील शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. अनेकवेळा मागणी करूनदेखील कन्नडला स्थान देण्यात न आल्याने करवेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर गोंधळ घालत महापालिकेत प्रवेश केला. त्यानंतर मनपा आयुक्तांच्या कक्षाबाहेरील त्यांचे नामफलक काढण्याचा प्रयत्न करत धुडगूस घातला. पण यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यासह बेळगावात कन्नड भाषेला प्राधान्य दिले पाहिजे, याबाबत अनेकवेळा निवेदन देऊनदेखील काही अधिकाऱ्यांकडून त्याचे पालन होत नाही.
अलिकडेच शहरात ईद ए मिलादची मिरवणूक काढण्यात आली होती. पण विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर केवळ ऊर्दू आणि इंग्रजी भाषेतील मजूकर होता. कन्नड भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले नाही. त्यामुळे मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी हास्यास्पद मागणी करणारे निवेदन यावेळी मनपा आयुक्तांना देण्यात आले. यापुढे या प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कन्नडिगांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
करवेचे कार्यकर्ते महापालिकेत प्रवेश करतील या शक्यतेने पोलिसांनी गेट बंद केले होते. पण पोलिसांना न जुमानता कन्नडिगांनी गेट ढकलून आत प्रवेश केला. त्यानंतर धावत जाऊन थेट मनपा आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या केला. इतकेच नव्हेतर मनपा आयुक्तांचा नामफलकही हटविण्याचा प्रयत्न केला. कन्नडिगांनी धुडगूस घातला तरीही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर मनपा आयुक्तांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेत यापुढे दक्षता घेऊन योग्य ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही दिली.