करूणासागर बाप्पा
अध्याय नववा
आपलं शरीर हे एक यंत्र असून त्याचा यंत्री म्हणजे चालक हा ईश्वर आहे हे ज्याच्या लक्षात आलंय तो सर्व गोष्टी त्याच्यावर सोपवून निर्धास्त झालेला असतो. हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी कसून प्रयत्न करून झाल्यावर जे फळ मिळेल त्यात तो समाधानी असतो. हे समाधानी राहणं हेच त्याच्या निर्धास्त असण्याचं कारण असतं. असं निर्धास्त होण्यासाठी सुखदु:ख, रागद्वेष, हर्षशोक आदि विकारांवर त्यानं मात केलेली असते. त्यामुळे क्षेत्रक्षेत्रज्ञविचार त्याच्या मनात पक्के रुजलेले असतात. असं बाप्पांनी सांगितल्यावर वरेण्याला त्याबाबत जाणून घ्यायची मोठीच उत्सुकता लागली आणि त्यानं बाप्पाना विचारलं,
किं क्षेत्रं कश्च तद्वेत्ति किं तज्ञानं गजानन ।
एतदाचक्ष्व मह्यं त्वं पृच्छते करुणाम्बुधे ।। 20 ।।
अर्थ- वरेण्य म्हणाला, हे गजानना, हे करुणासागरा क्षेत्र म्हणजे काय, ते कोण जाणतो, त्याचे ज्ञान म्हणजे काय, हे सर्व तू मला समजावून सांग.
विवरण- वरेण्य राजा बाप्पांना करूणासागर म्हणून संबोधतोय. यापूर्वी आपण भक्तलक्षणांचा अभ्यास केलेला आहे. त्यात भक्ताच्या अंगी करुणा वास करत असल्याचे आपण लक्षात घेतले आहे. करुणा म्हणजे कोणत्याही अटीशिवाय आणि निरपेक्षतेनं प्रेम करणे. आईच्या मनात मुलांविषयी अशीच करुणा पाझरत असते म्हणून प्रीतीचा सागर, अमृताची धार असे आईच्या प्रेमाबद्दल बोलले जाते.
अशी कथा सांगतात की, एक मुलगा त्याच्या प्रेयसीच्या मागणीनुसार आईला ठार मारून तिचे काळीज घेऊन निघाला असता त्याला ठेच लागून तो धडपडतो. त्यावर त्या काळजातून बोल येतात की, बाळ तुला लागलं तर नाहीना? अपत्याशी नाळेवारेचा संबंध असल्याने अत्यंत आपुलकीच्या भावनेने अपत्याबद्दल आईच्या मनातून करुणा पाझरत असते. आपण सर्व बाप्पांची लेकरेच असल्याने त्यांच्या मनातही सर्वांविषयी सतत करूणा पाझरत असते म्हणून त्यांना वरेण्यराजा करुणासागर असं म्हणतोय. ज्याप्रमाणे विहिरीतील उमाळ्यातून कोणत्याही कारणाशिवाय पाणी पाझरत असते त्याप्रमाणे भक्तांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाच्या उमाळ्यातून बाप्पांना भक्तांबद्दल वाटणारे प्रेम, आपुलकी पाझरत असते. बाप्पांना सर्वच भक्त प्रिय असतात.
जेव्हढी ज्याची भक्ती जास्त तेव्हढ्या प्रमाणात बाप्पांच्या प्रेमाची अनुभूती भक्ताला येत राहते. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ईश्वराची भावना ठेवून त्यानुसार त्याच्याशी प्रेमाची, आपुलकीची भावना ठेवणे हीच खरी भक्ती. ज्ञानेश्वरीत आपल्याला असं वाचायला मिळतं की, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्चित जाण माझा । असं भगवंतांनी पार्थाला सांगितलंय.
वरेण्यराजा तर बाप्पांचा श्रेष्ठ भक्त होता. त्यामुळे बाप्पांच्या करुणेचा त्याला पुरेपूर प्रत्यय येत होता. माउलींनी सांगितल्याप्रमाणे जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत असा स्वभाव होण्यासाठी काय करायला पाहिजे ते संत एकनाथ महाराजांचे सद्गुरु श्रीजनार्दन महाराज पुढील अभंगात सांगत आहेत. ते म्हणतात, देह शुद्ध करुनी भजनीं भजावे । आणिकांचे नाठवावे दोष-गुण ।।1।। साधनें समाधी नको पां उपाधी । सर्व समबुद्धी करी मन ।।2।। म्हणे जनार्दन घेई अनुताप । सांडी पां संकल्प एकनाथा ।।3।।
श्रीजनार्दनस्वामी म्हणतात देह शुद्धी करून कुणाचेही गुणदोष न आठवत बसता भजनी रंगून जावं. सर्वत्र समबुद्धि ठेवली की, साधनं, समाधी आणि उपाधी यांची गरज पडत नाही. त्यासाठी एकनाथा कोणताही संकल्प करू नकोस. गोष्टी जशा घडतील तशा स्वीकारत जा म्हणजे तुझे विकार कमी होतील आणि त्याप्रमाणात ईश्वरी करुणेच्या पाझराची अनुभूती तुला येत जाईल आणि त्या पाझाराचे झऱ्यात रुपांतर कधी झाले हे कळणारही नाही.
क्रमश: