For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करुणा गौरांग

06:37 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
करुणा गौरांग
Advertisement

भगवान श्रीकृष्ण हे स्वत: जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळी आपल्या कऊणेने त्यांनी अनेकांना श्रीकृष्णभक्तीचा मार्ग दाखविला. त्याचबरोबर भक्ती म्हणजे काय हेही सर्व जगाला शिकविले. सर्वसाधारणपणे भक्ती म्हटले की लोक समजतात भगवंतांकडून, देवीदेवतांकडून काहीतरी प्राप्त करणे. परंतु गीता-भागवत ग्रंथानुसार भक्ती ह्याचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्णांची अहैतुकी निरंतर सेवा करणे जो की जीवाचा स्वभाव आहे. श्रीचैतन्य महाप्रभु ज्यावेळी दक्षिण भारत यात्रेला गेले होते तेव्हा कूर्मक्षेत्र येथील वासुदेव यांच्या भेटीमध्ये भक्ती म्हणजे काय हे जगाला दाखवून देतात.

Advertisement

कूर्मक्षेत्र येथे वासुदेव विप्र नावाचा एक कृष्ण भक्त राहत असे. परंतु तो कुष्ठरोगाने ग्रासला असल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी आणि समाजाने गावाबाहेर एका झोपडीत रहावयास ठेवले होते. कुष्ठरोगामुळे तो उभासुद्धा राहू शकत नव्हता आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा तो आपली कूस बदलत असे तेव्हा त्याच्या कुष्ठरोगाने सडलेल्या शरीरातून किडे, रक्त आणि पू जमिनीवर पडत असे. वासुदेव इतका दयाळू आणि भावनाशील होता की तो जमिनीवर पडलेले किडे परत आपल्या शरीरामध्ये ठेवीत असे. त्याची भावना होती की आपले शरीर हे ह्या कुष्ठरोग्यांच्या किड्यांसाठी आहे. इतका वासुदेव हा आपल्या शरीरापासून अनासक्त होता, कारण त्याने हे पूर्णपणे जाणले होते की आपण शरीर नसून सनातन आत्मा आहोत.

सर्वसाधारणपणे श्रीकृष्णभक्त हे प्रसिद्धीपासून दूर असतात. तसा हा वासुदेव गरीब आणि रोगी असल्यामुळे लोकांनी त्याला वाळीतच टाकले होते तरीही आपल्या कृष्णभक्तीचा त्याला गर्व नव्हता. त्याला जेव्हा कळले की चैतन्य महाप्रभु जवळच एका घरामध्ये आलेले आहेत, तेव्हा तो तेथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की चैतन्य महाप्रभु तेथून केव्हाच पुढच्या प्रवासाला निघून गेले आहेत. ही वार्ता जेव्हा वासुदेवला कळली तेव्हा तो अतिशय निराश झाला आणि मूर्च्छित होऊन पडला. चैतन्य महाप्रभु आपल्या भक्तांबाबत इतके कनवाळू आहेत की जरी त्यांनी गांव सोडून बरेच अंतर पार केले होते तरी त्यांना कळू शकले की भेट झाली नाही म्हणून आपला भक्त फार दु:खी आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 18.61) ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । अर्थात ‘परमेश्वर प्रत्येक जिवाच्या हृदयात स्थित आहेत’ वासुदेवाच्या हृदयातही तेच भगवंत असल्याने त्याच्या भावना चैतन्य महाप्रभूंना कळाल्या.

Advertisement

त्यांनी ताबडतोब आपली पावले परत फिरविली आणि ते वासुदेवच्या घरी जाण्यासाठी परतले. त्यांच्या मनात वासुदेवची भेट घेऊन त्याला प्रेमाने आलिंगन देण्याची इच्छा होती. जेव्हा चैतन्य महाप्रभु त्याच्या झोपडीजवळ आले तेव्हा कसाबसा वासुदेव उठून उभा राहिला, त्याला शारीरिकदृष्ट्या खूप कष्ट होत होते तरी प्रत्यक्ष भगवंत आपल्या घरी आले आहेत हे पाहून तो सर्व कष्ट विसरून गेला. चैतन्य महाप्रभु जेव्हा वासुदेवला आलिंगन द्यायला त्याच्या जवळ आले तो त्यांच्यापासून दूर होऊ लागला. त्याला वाटत होते की आपल्या ह्या अपवित्र रक्त, मांस, पु, किडे बाहेर पडत असलेल्या दुर्गंधीयुक्त शरीराचा सुंदर सुवर्ण वर्ण असलेल्या चैतन्य महाप्रभूंना स्पर्श होऊ नये. पण चैतन्य महाप्रभु हे दिव्यस्तरावर असल्याने त्यांनी या भौतिक अवस्थेचा विचार केला नाही आणि वासुदेवाला प्रेमाने जवळ ओढून दीर्घ आलिंगन दिले. हरिभक्तांचे म्हणजे वैष्णवांचे शरीर हे बाह्यदृष्ट्या सर्वांसारखेच दिसत असले तरी ते श्रीकृष्णसेवेमध्ये समर्पित असल्याने दिव्य असते. ज्यांना ह्या वास्तविक स्थितीचे ज्ञान नाही ते वैष्णवांच्या शरीराकडे पाहून फार मोठी चूक करतात आणि श्रीकृष्ण कृपेपासून वंचित राहतात. चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य स्पर्शाने वासुदेवचे शरीर एकदम तंदुऊस्त आणि आकर्षक दिसू लागले. हा चमत्कार पाहिल्यावर वासुदेव चैतन्य महाप्रभूंच्या चरणावर आपले मस्तक ठेवून नम्रपणे सुदामाने श्रीकृष्णासमोर व्यक्त केलेल्या भावनेचा उल्लेख करत नम्रपणे म्हणाला (भा 10.81.16) क्वाहं दरिद्र:पापीयान् क्व कृष्ण: श्रीनिकेतन:। ब्रह्मबन्धुरिति स्माहं बाहुभ्यां परिरम्भति: अर्थात ‘कोठे मी? अत्यंत पापी आणि दरिद्री असा ब्रम्हबंधू आणि कोठे कृष्ण? षडैश्वर्यपूर्ण असे पुऊषोत्तम भगवान. तरीही त्यांनी मला प्रेमपूर्वक आलिंगन दिले!” त्यानंतर वासुदेव चैतन्य महाप्रभूंना म्हणाला, भगवंता! मला पाहिल्यावर पापी मनुष्यसुद्धा माझ्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे दूर पळून जातात पण आपण इतके कृपाळू आहात की प्रेमाने माझी इच्छा नसतानाही मला जवळ खेचून घेऊन आलिंगन दिलेत. आपण स्वतंत्र ईश्वर, पतित पावन, कऊणावतार आहात. अशी कृपा साधारण जीवांकडून प्राप्त होत नाही, आपण दिव्य पुऊष आहात. चैतन्य महाप्रभु म्हणाले हरिभक्ताचे शरीर हे कधीही भौतिक नसते, त्यांचे शरीर हे दिव्य आणि आध्यात्मिक असते. चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य स्पर्शाने वासुदेवचे शरीर पूर्णपणे कुष्ठरोगमुक्त झाले. सर्वसाधारणपणे लोक हे देवदेवतांकडे आपले शरीर हे रोगमुक्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात पण वासुदेवला वेगळीच चिंता होती जी त्याची आणि सर्वसाधारणपणे शुद्ध अंत:करणाच्या हरिभक्तांची भावना प्रकट करतात. वासुदेवला वाटत होते की आता जेव्हा मी चैतन्य महाप्रभूंच्या स्पर्शाने पूर्णपणे कुष्ठरोगमुक्त झालो आहे ही वार्ता सर्वांना कळेल तेव्हा ते मला चैतन्य महाप्रभूंचा कृपापात्र म्हणून जास्तच मानसन्मान देऊ लागतील आणि हा मानसन्मान माझ्या आध्यात्मिक पतनाचे कारण बनू शकतो.

चैतन्य महाप्रभूंनी वासुदेवाच्या मनातील ही नम्र भावना ओळखली आणि त्याला उपदेश केला ‘तू नित्य श्रीकृष्णाचा सेवक आहेस हे समजून त्याच्या पवित्र नामाचे चिंतन कर म्हणजे तुला अभिमान वाटणार नाही. त्याचबरोबर सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्ण उपदेशाचा (गीता-भागवत) प्रचार कर, त्यामुळे श्रीकृष्ण तुझा त्वरित स्वीकार करतील.”

याप्रमाणे चैतन्य महाप्रभुंनी वासुदेववर कृपा करून सर्व जगाला दाखवून दिले की हरिभक्त हा काही भौतिक वस्तू प्राप्त करण्यासाठी भक्ती करत नाही तर आपल्या हृदयात भगवान श्रीकृष्णांशी असलेले संबंध पुन:स्थापित करण्यासाठी मनुष्य जन्माचा सार्थ उपयोग करतात. यासाठी चैतन्य महाप्रभुंचे नाव आहे ‘कऊणा गौरांग’ अर्थात आपली कऊणा सर्व जीवांवर करतात आणि त्यांना श्रीकृष्णभक्ती प्रदान करतात. श्रीकृष्णांसारखेच संतांचेही हृदय कऊणामय असते. आणि सर्व जीवांना या दु:खमय जगातून कायमची मुक्ती मिळावी आणि भगवंतांच्या चरणांचा त्यांनी आश्र्रय घ्यावा म्हणून ते गीता-भागवतचा प्रचार करतात. संतांच्या दृष्टीने जे श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये नाहीत ते ‘रंजलेले आणि गांजलेले’ असतात म्हणून त्यांना प्रेमाने आपलेसे करून हरिभक्तीमध्ये जीवन समर्पित करण्याची प्रेरणा ते आपल्या जीवनावरून देत असतात. संत तुकाराम महाराज आपल्या एका प्रसिद्ध अभंगात म्हणतात, जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ।।1।। तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा ।।ध्रु.।।मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ।।2।।ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ।।3।। दया करणें जें पुत्रासी। तेचि दासा आणि दासी ।।4।। तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ।।5।।अर्थात ‘जीव सुखाने रंगलेले असोत अथवा दु:खाने गांजलेले असोत, त्या सर्वाना कोणताही भेदभाव न करता हे सर्व आपले आहेत, असे जो मानतो तोच खरा साधू असल्याचे समजावे आणि त्याच्याच जवळ भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणावे. लोणी जसे अंतर्बाह्य मऊ असते, त्याप्रमाणे सज्जनांचे चित्त असते. ज्यांना कोणी आश्र्रय देत नाही अशा अनाथांनाही तो आपल्या हृदयात स्थान देतो. जे प्रेम आपल्या पुत्रावर करतो तसेच प्रेम तो आपल्या सेवकांवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधूंविषयी किती सांगू? तो तर साक्षात भगवंतांची मूर्ती आहे.” साधू सर्व जीवांना भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीतून पाहतो म्हणून सर्वजण मग ते श्रीमंत असोत अथवा गरीब असोत. यासाठी साधू भगवान श्रीकृष्णांचा गीता-भागवत ग्रंथांमधील उपदेशाचा प्रचार सर्व जीवांच्या उद्धारासाठी करतो. यादृष्टीने तो भगवंतांचा प्रतिनिधी रूपाने सर्वाना प्रेमाने जवळ करतो म्हणून त्याला भगवंतासमान समजले जाते.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.