करुण नायरचे दमदार शतक
वृत्तसंस्था/ शिमोगा
रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील येथे सुरु असलेल्या सामन्यातील रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा वारंवार अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला. पण करुण नायरच्या दमदार शतकामुळे यजमान कर्नाटकाने गोवा संघविरुद्ध पहिल्या डावात 371 धावा जमविल्या. करुण नायरचे हे 25 वे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शतक आहे.
गेल्या जुलैमध्ये झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये करुण नायरला कसोटी मालिकेच्या मध्यंतरी संघातून वगळण्यात आले होते. गोवा संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने 267 चेंडूत नाबाद 174 धावा झळकाविल्या. कर्नाटकाने 5 बाद 222 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. 86 धावांवर नाबाद राहिलेल्या करुण नायरने आपले शतक पूर्ण केले. श्रेयस गोपालने 57 तर विशाख विजयकुमारने 31 धावा केल्या. कर्नाटकाचा पहिला डाव 110.1 षटकात 371 धावांत आटोपला. गोवा संघातर्फे अर्जुन तेंडुलकर आणि कौशिक यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर गोवा संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात करताना 1 बाद 28 धावा जमविल्या. त्यावेळी पुन्हा पावसाला प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशीच्या खेळातील उर्वरित दोन सत्रांमध्ये खेळ होऊ शकला नाही.
महाराष्ट्राला 101 धावांची आघाडी
पृथ्वी शॉ : नाबाद 41
चंदीगड : रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या सामन्यात महाराष्ट्राने चंदीगडवर पहिल्या डावात 104 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद 66 धावा जमवित चंदीगडवर एकूण 170 धावांची बढत मिळवली आहे. महाराष्ट्राने पहिल्या डावात 313 धावा जमविल्यानंतर चंदीगडचा पहिला डाव 209 धावांत आटोपला. रमन बिश्नोईने 54 तर बिर्लाने 56 धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे विकी ओसवालने 40 धावांत 6 गडी बाद केले. त्यानंतर महाराष्ट्राने दिवसअखेर दुसऱ्या डावात 11 षटकात बिनबाद 66 धावा जमविल्या. पृथ्वी शॉ 41 धावांवर खेळत आहे.
दुबेचे नाबाद शतक
राजकोट आणि मध्यप्रदेश यांच्यात सुरु असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी यश दुबेच्या नाबाद शतकाने मध्यप्रदेशचा पहिला डाव सावरला. सौराष्ट्रचा पहिला डाव 260 धावांवर आटोपल्यानंतर मध्यप्रदेशने दिवसअखेर पहिल्या डावात 4 बाद 195 धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज यश दुबे 236 चेंडूत 109 धावांवर खेळत आहे. दुबे आणि हिमांषु मंत्री यांनी दुसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागिदारी केली. तसेच दुबे व हर्ष गवळी यांनी सलामीच्या गड्यासाठी 87 धावांची भर घातली.
संक्षिप्त धावफलक - कर्नाटक प. डाव सर्वबाद 371 (करुण नायर नाबाद 174, श्रेयस गोपाल 57, विजयकुमार 31, अर्जुन तेंडुलकर व कौशिक प्रत्येकी 3 बळी), गोवा प. डाव 1 बाद 28, महाराष्ट्र प. डाव 313, चंदीगड प. डाव 209 (बिश्नोई 54, बिर्ला 56, ओसवाल 6-40), महाराष्ट्र दु. डाव बिनबाद 66.
सौराष्ट्र प. डाव 260, मध्यप्रदेश प. डाव 4 बाद 195 (यश दुबे खेळत आहे 109).