Pandharpur : पंढरपूरात गोपाळकाल्याच्या जयघोषात कार्तिकी वारीची सांगता
गोपाळपूरात भक्तिमय वातावरणात कार्तिकी यात्रेचा समारोप
पंढरपूर : कार्तिकी बारीची सांगता बुधबार, ५ नोव्हेंबर रोजी गोपाळकाला होऊन झाली. गोड झाला, गोपाळांनी गोड केलाच्या जयघोषात अवधी श्री कृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी हजारो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमन गेली.
कार्तिकी यात्रेच्या सोहळ्याची परंपरेप्रमाणे काल्याच्या उत्सवाने बुधवारी सांगता करण्यात आली. यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने वारकऱ्यांना जास्तीत जास्त सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती. दरम्यान, या काल्याच्या उत्सवाबरोबरच खऱ्या अर्थाने चातुर्मासाची देखील समाप्ती होत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून खास चातुर्मासासाठी येथे मुक्कामास असलेल्या वारकऱ्यांना देखील आपआपल्या गावाकडे परत जाण्याचे आता वेध लागले आहेत.
कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते पौर्णिमेच्या दिवशी पंरपरेनुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे होणाऱ्या गोपाळकाल्याचे. त्यानुसार बुधवारी पौर्णिमेच्या दिवशी पहाटेपासूनच विविध संतांच्या दिंड्या चंद्रभागा नदीचे स्नान करून गोपाळपूरकडे काल्यासाठी रवाना होत होत्या. गोपाळपूर येथील भगवान श्री कृष्ण मंदिरात काल्याचे कीर्तन झाले. गोपाळपूर येथील बाताबरण आज दिवसभर भक्तीमय होते.
दरम्यान, पहाटेपासूनच एकामागून एक अशा विविध संतांच्या छोट्यामोठ्या दिंड्या, पालख्या विठ्ठल नामाचा गरज करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या. गोपाळकाल्याच्या सोहळ्यासाठी आलेले भाविक मोठ्या श्रद्धेने श्रीगोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालीत होते. मंदिर परिसरामध्ये मिळेल त्या जागीदाटीवाटीत उभे राहून काल्याचे कीर्तन करून वारकरी एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेत होते. कृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांचे वाटप केले जात होते.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीने खास पाण्याच्या टँकरची सोय देखील केलेली होती. गोपाळकाल्याचा उत्सब सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खास पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता.
चातुर्मासाची समाप्ती
कार्तिकी यात्रेतील गोपाळपूर काल्यानंतर चातुर्मासाची समाप्ती होत असल्याने आषाढी यात्रेपासून म्हणजेच तब्बल चार महिने चातुर्मासासाठी शहरातील विविध मठ, धर्मशाळांमधून वास्तव्यास असलेल्या वारकऱ्यांना देखील आता आपआपल्या गावाकडे परत जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे काल्याच्या उत्सवानंतर विविध मठ, धर्मशाळांमधून वारकऱ्यांची गावाकडे परत जाण्यासाठी सामानाची आवाराआवरी करण्याची लगबग दिसत होती.