तालुक्यात कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी
रविवारी दिवसभर वारकरी भजन, कीर्तन, विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग : पंढरपुरात पायी दिंड्याही पोहोचल्या
वार्ताहर/किणये
होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी!
काय करावी साधने, फळ अवघेचि येणे!!
अभिमान नुरे, कोड अवघेचि पुरे !
तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा !!
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे मनुष्य प्राण्याने वारकरी व्हायला पाहिजे. इतर साधने व्यर्थ आहेत. अप्ध्यात्माच्या मार्गात सर्व काही सर्व प्रकारची फळ मिळतात या मार्गात अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. विठ्ठलाच्या भक्तीत आपल्या डोळ्यात विठ्ठल बसून राहतो आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला येतो. याप्रमाणेच रविवारी दिवसभर तालुक्यातील वारकरी भजन, कीर्तन व विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होतो. तालुक्यात रविवारी कार्तिक एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी केली.
विविध गावांमध्ये असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये कार्तिक एकादशीनिमित्त काकडारती, भजन ,प्रवचन, कीर्तन असे कार्यक्रम झाले. ‘उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा‘ असे म्हणत वारकरी काकडारती करत होते. अगदी मनोभावे विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घेतले. विविध गावातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. विधिवत अभिषेक केल्यानंतर महाआरती केली. मंदिरांमध्ये महिला व भजनी मंडळाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ कार्यक्रम झाले. प्रवचन व कीर्तन निरूपणाचे कार्यक्रम उत्साहात झाले.
पायी दिंड्या पोहोचल्या पंढरपुरीत
कार्तिक एकादशीनिमित्त तालुक्याच्या पश्चिम भागातील पायी दिंड्या गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच मार्गस्थ झाल्या होत्या. त्या दिंड्या शुक्रवारी व शनिवारी पंढरपूर नगरीत पोहोचलेल्या आहेत. गेल्या तीन चार दिवसापासून रेल्वे, टेम्पो व खासगी वाहनांमधून भाविक पंढरपूरला निघाले होते. त्यांनीही चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. गावागावामध्ये कार्तिक एकादशीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. काही गावांमध्ये दिंड्या काढल्या. तर दिवसभर भजन व कीर्तन कार्यक्रम करण्यात आले.