महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्तिक माहात्म्य

06:20 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1960 च्या दशकात आम्ही आमच्या आजीबरोबर कार्तिक महिन्यात   विठ्ठलऊक्मिणी मंदिरात पहाटे काकड आरतीसाठी जात असू. त्यावेळेचे मन प्रसन्न करणारे पहाटेचे मंदिरातील वातावरण आणि त्यातूनच विठ्ठल भक्तीचे संस्कार हे आजही आमच्या आठवणीत आहेत. त्यावेळी अनेक घरांमध्ये लाइटही नव्हते, आमच्या घरी तर आकाश कंदीलमध्ये मंद ज्योतीची पणती प्रकाशासाठी ठेवत असत, रस्त्यावरच्या खांबावर तुरळक मिणमिणते लाईट असायचे. पण सकाळच्या प्रहरी मंदिरासमोरील दीपस्तंभावर लावलेल्या पणत्यांच्या रांगा आणि मंदिरामध्ये चाललेले कीर्तन, अभिषेक, हरिकथा आजही कार्तिक महिना आला की आठवणी जागृत करतात. भागवत धर्मामध्ये कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे.

Advertisement

हा महिना भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांसाठी एक विशेष पर्वणी असते. या महिन्यात बाळकृष्णाने अनेक लीला केल्या, त्यांचे भक्त स्मरण करतात. त्यातील एक महत्त्वाची लीला म्हणजे उखळ बंधन लीला. यशोदामाईनी बाळकृष्णाला दही लोणी चोरले म्हणून उखळाला बांधून शिक्षा केली होती. या दिव्य लीलेमध्ये श्रीकृष्णभक्तीचे रहस्य दडलेले आहे जे पद्म पुराणमध्ये दामोदराष्टकामध्ये वर्णन केले आहे. वैष्णव हे अष्टक सकाळ-संध्याकाळ आपल्या घरांमध्ये आणि मंदिरामध्ये कार्तिक महिन्यामध्ये गातात आणि त्याचवेळी भगवंतांना दीप ओवाळतात. वाचकांसाठी मराठी भाषांतरासहित हे अष्टक येथे प्रस्तुत केले आहे. आपणही आपल्या घरात कार्तिक महिन्यात भगवान कृष्णासमोर हे अष्टक गात दीप ओवाळू शकता.  नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले भ्राजमानम यशोदाभियोलूखलाद्धावमानं परामृष्टमत्यन्ततो द्रुत्य गोप्या ।।1।। जे सच्चिदानंद-स्वऊप आहेत, ज्यांच्या कानात सुंदर मकर-कुण्डल डोलत आहेत, गोकुळ नामक दिव्य धामात ज्यांचे वास्तव्य अतिशय शोभायमान आहे, जे (यशोदामाता ताक घुसळत होती ते मडके फोडल्यामुळे आणि शिक्मयावरील लोणी चोरल्यामुळे) यशोदा मातेच्या भयाने पळून जात आहेत परंतु माता यशोदेने त्यांना अधिक वेगाने धावत पकडले अशा सर्वेश्वर भगवान श्री दामोदरांना मी वंदन करतो. ऊदन्तं मुहुर्नेत्रयुग्मं मृजन्त कराम्भोजयुग्मेन सातङ्कनेत्रम् । मुहु: श्वासकम्पत्रिरेखाङ्ककण्ठ-स्थितग्रैव-दामोदरं भक्तिबद्धम् ।2। (मातेच्या हातातील छडी पाहून) ते ऊदन करू लागले आणि वारंवार आपल्या करकमळांनी डोळे पुसू लागले. ज्यांचे नेत्र भयाने ओतप्रोत दिसत आहेत, श्वासाचा वेग अधिक वाढल्याने शंखासमान त्रिरेखायुक्त कण्ठावरील मोत्यांचा हार कंपित होत आहे अशा भगवान श्री दामोदरांना, ज्यांचे उदर दोरीने नसून मातेच्या शुद्ध वात्सल्य प्रेमाने बांधले गेले आहे, मी वंदन करतो. इतीदृक् स्वलीलाभिरानन्दकुण्डे स्वघोषं निमज्जन्तमाख्यापयन्तम् । तदीयेषिताज्ञेषु भक्तैर्जितत्वं पुन: प्रेमतस्तं शतावृत्ति वन्दे ।।3।। अशा प्रकारच्या बाललीलांनी गोकुळवासियांना जे परम आनंद प्रदान करीत आहेत. भगवंतांची महानता, त्यांचे ऐश्वर्य आणि ज्ञान जाणून, आदर आणि ऐश्वर्य विरहित भावाने त्यांच्यावर प्रगाढ प्रेम करणारे भक्तच त्यांना जिंकू शकतात. त्या भगवान श्रीदामोदरांना मी अत्यंत भावपूर्ण शत शत प्रणाम करतो. वरं देव मोक्षं न मोक्षावधिं वा न चान्यं वृणेऽहं वरेषादपीह । इदं ते वपुर्नाथ गोपालबालं सदा मे मनस्याविरास्तां किमन्यै: ।।4।। ‘हे भगवान! तुम्ही सर्व वरदान प्रदान करण्यास समर्थ आहात, तरीही मी तुमच्याकडे मुक्तीची आशा करीत नाही किंवा निरंतर वैकुंठवासाची वा इतर कोणतीही इच्छा करीत नाही. मी केवळ एकच प्रार्थना करतो की, तुमच्या बाललीला सदैव माझ्या अंत:करणात वास करोत. हे भगवंता! आपले परमात्मा स्वरूपही जाणण्याची माझी इच्छा नाही. वृंदावनातील आपले बाल-गोपाळरूप माझ्या हृदयी सदैव प्रकट राहो. इदं ते मुखाम्भोजमत्यन्तनीलैर्-वृतं कुन्तलै: स्निग्ध-रक्तैश्च गोप्या । मुहुश्चुम्बतिं बिम्बरक्तधरं मे मनस्याविरास्तां अलं लक्षलाभै: ।।5।। हे भगवन! यशोदा मातेद्वारा पुन: पुन्हा चुंबित, कोमल केशांनी घेरलेले, काहीसा लालिमायुक्त आपले नीलवर्ण मुखकमळ, बिम्बफळासमान रक्तवर्ण आपले अधर माझ्या हृदयी सदैव विराजमान राहो; अन्य लाखो लाभांचा माझ्यासाठी काहीच उपयोग नाही. नमो देव दामोदरानन्त विष्णो प्रसीद प्रभो दु:खजालाब्धमिग्नम् । कृपादृष्टिवृष्ट्यातिदीनं बतानु गृहाणेश मां अज्ञमेध्यक्षिदृश्य: ।।6।। हे भगवन! मी आपणाला नमन करतो. हे दामोदर! हे अनंत! हे विष्णो! हे प्रभो! कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. आपल्या कृपादृष्टीचा वर्षाव करून, सांसारिक दु:खसागरात बुडालेल्या या दीन-हीन, अज्ञानी मूर्खाचा उद्धार करा आणि माझ्या नेत्रांना आपले दर्शन द्या. कुवेरात्मजौ बद्धमूर्त्यैव यद्वत्त्व या मोचितौ भक्तिभाजौ कृतौ च । तथा प्रेमभक्तिं स्वकं मे प्रयच्छ न मोक्षे ग्रहो मेऽस्ति दामोदरेह ।।7।। हे दामोदर! दोरीने उखळाला बांधलेल्या रूपात ज्या प्रकारे कुबेराचे दोन पुत्र, मणिग्रीव आणि नलकुबेर यांना नारद मुनींच्या शापातून आपण मुक्त केले आणि त्यांना महान भक्त बनविले, त्याप्रकारे मलादेखील आपली प्रेमभक्ती प्रदान करा. मी केवळ हीच इच्छा करतो; अन्य कोणत्याही मुक्तीची मला इच्छा नाही. नमस्तेऽस्तु दाम्ने स्फुरद्दीप्तिधाम्ने त्वदीयोदरायाथ विश्वस्य धाम्ने । नमो राधिकायै त्वदीयप्रियायै नमोऽनन्तलीलाय देवाय तुभ्यम् ।।8।। हे दामोदर! मी सर्वप्रथम त्या तेजोमय दामाला (दोरीला) प्रणाम करतो. नंतर संपूर्ण विश्वाचे आधारस्वरूप असलेल्या आपल्या उदराला नमस्कार करतो. आपली प्रियतमा राधाराणीच्या चरणांना नमन करतो आणि अनंत लीलामयस्वरूप आपणाला सकळ नमस्कार करतो.

Advertisement

संत तुकाराम महाराजांनीसुद्धा ह्या सुंदर लीलेचे स्मरण खालील अभंगातून केले आहे. मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणी । दही दूध तूप लोणी शिंकी नुरेचि कांही । मेळवुनी पोरें तेथे रिघे एकसरें। वेगीं आणोनी सामोरे तेथे लोणी खाय।।1।। हरि सोंकला वो सोंकला वो सोंकला तो वारी तुज लाज नाही तरी । आम्हां सांपडतां उरी तुज मज नाही ।।2।। तुज वाटतसे कोड यासी लागतसे गोड। काय हांसतेसी वेड तुज लागले वो । आम्ही जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगो भांडखोरी लाज वाटे आम्हांसी ।।3।। मुख मळीण वदन उभा हाडतिये घोणें । तंव दसवंती म्हणे आणा शीक लावू। थोर आणिला कांटाळा घरी दारी लोकपाळां । डेरा रिघोनि घुसळा तेथे लोणी खाय ।।4।। मिळोनियां सकळां दावे लावुनियां गळा । कैशा बांधिती उखळा येथे राहे उगा । बरा सांपडलासी हरी आजिच्याने करिसील चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे।।5।। फांकल्या सकळा उपडूनियां उखळा मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धावे तुकयाचा दातार आळंगिला वेंगी ।।6।। अर्थात ‘सर्व गौळणी यशोदेकडे गाऱ्हाणे करू लागल्या की आता आमच्या शिंक्मयामध्ये दही, दूध, तूप, लोणी काहीच उरत नाही, तुझा कान्हा आणि सर्व पोरे मिळून जे काही असेल ते सर्व घेऊन त्वरेने येथून निघून जातात आणि सर्व खाऊन टाकतात. यशोदे तू तुझ्या हरीला काहीतरी शिकव, तो फारच खोडकर झाला आहे. तू काही शिकवले नाही तर आम्ही समजू की तुलाही आता काय लाज राहिली नाही. जर तो हरी आमच्या हाती सापडला तर आम्ही तुझे काहीही चालू देणार नाही. हे यशोदे, तुला तुझ्या पोराचे कोडकौतुक वाटते आणि तुझ्या पोराला चोरी करणे फार गोड वाटते. आम्ही इतके तळमळीने तुला सांगतो आहोत तरीदेखील आमच्याकडे बघून हसतेस, तुला काय वाटत नाही काय? तुला वेड लागले की काय? हे यशोदे, आम्ही तुझ्याकडे पहावे आणि गप्प बसावे परंतु आता तर तुझ्या हरीने तर कमालच केली, गावातील गोप गोपिकांनादेखील त्याचा छंद लागला आहे. या गोष्टी सांगण्याससुद्धा आम्हाला लाज वाटत आहे. हे सर्व ऐकून कृष्णाचे मुख लज्जित झाले व तो मान खाली घालून तसाच उभा राहिला. त्यावेळी यशोदा म्हणाली, आणा त्याला इकडे आपण त्याला शिक्षा करू. मग यशोदा आणि सर्व गौळणीनी त्याला उखळाला बांधले. तुकाराम महाराज म्हणतात, हरीला बांधून गौळणी निघून गेल्या त्यावेळी कृष्णाने दोन वृक्षांच्या मधून उखळ ओढीत आणला व विमल आणि अर्जुन या दोन वृक्षांना उपटून टाकले. त्यावेळी मोठा आवाज झाला मग यशोदेचा धीरच सुटला व आपला स्वामी कृष्ण सुखरूप आहे की नाही ते यशोदेने पहिले व धावत जाऊन प्रेमाने त्याला आलिंगन दिले.”

-वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article