कार्तिक काटेची संग्रामला एकलांगीवर अस्मान
युधिष्ठिर हरियाणा, पार्थ पाटील यांचे प्रेक्षणीय विजय : कडोली कुस्ती मैदान
कडोली/ मोहन कुट्रे, उमेश मजुकर
कडोली येथे गुढीपाडव्यानिमित्त कडोली कुस्तीगीर संघटना आयोजित भव्य कुस्ती मैदानात डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने 14 व्या मिनिटाला महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम पाटील कोल्हापूर-पुणेचा एकलांगीवर अस्मान दाखवून उपस्थित 20 हजारहून अधिक कुस्तीशौकीनांची मने जिंकली.
कडोली येथे बसवाण्णा मंदिर शेजारील भरतकुमार भोसले कुस्ती मैदानावर घेण्यात आलेल्या या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम पाटील एएसआय आर्मी पुणे ही कुस्ती प्रमुख पाहुणे ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, बसवंत मायाण्णाचे व ग्रा. पं.चे सर्व सदस्य व कुस्तीगीर संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला संग्राम पाटीलने एकेरीपट काढून कार्तिक काटेला खाली घेत झोळी बांधून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून कार्तिकने सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला संग्रामने दुहेरीपट काढत पुन्हा कार्तिकला खाली घेऊन दोन वेळेला घिस्सावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी कार्तिकने त्यातून सुटका करून घेतली. यावेळी कार्तिक काटे पराभूत होतो असे वाटत असताना आपला अनुभवचा पुरेपूर फायदा कार्तिकने करून खालून डंकी मारत सुटका करून घेतली. 11 व्या मिनिटाला संग्रामने एकेरीपट काढून कार्तिकला खाली घेतले व घिस्सा मारीत चीत करण्याचा प्रयत्न करीत असताना कार्तिकने खालून डंकी मारत संग्रामला खाली घेत एकलांगी मजबूत भरून चीत करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता. पण पंचांनी संग्रामचा पाठीचा कांही भाग जमिनीला न लागल्याने पुन्हा कुस्ती खडाखडीने सुरूवात केली. पण 14 व्या मिनिटाला संग्रामने पायाला टाच मारून कार्तिकला खाली घेतले व मानेवर घुटना ठेऊन चीत करण्याचा प्रयत्न असताना पुन्हा कार्तिकने खालून डंकी मारत संग्रामवर ताबा मिळवित संग्रामला कळत न कळत मजबूत एकलांगी भरून एकलांगीवर चारीमुंड्या चीत करून यावर्षीची विजयी घोडदौड कायम राखली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती युधिष्ठिर हरियाणा व उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे ही कुस्ती आकाश कटांबळे, बसवंत मायाण्णाचे, भाऊ पाटील, उदय सिद्दण्णावर, सिद्राय मुतगेकर, विश्वनाथ पाटील व राजू पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. ही कुस्ती डावप्रतिडावाने बराच उशीर झुंजली. शेवटी पंचांनी गुणांवर विजय करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये युधिष्ठिरने एकेरीपट काढून लपेटवरती गुण मिळवत विजय संपादन केला. तिसऱ्या क्रमांका कुस्ती संदीप ठाकुर सांगली व शिवानंद निर्वानहट्टी ही कुस्ती बराच उशीरा प्रतिडावाने रंगली. वेळअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार कार्वे व संजू इंगळगी ही कुस्तीही बरोबरीत राहिली. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेसच्या धैर्यशील मानेने कंग्राळीच्या कामेश पाटीलला ढाकेवरती पराभव केले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिक्कदिनकोप्पने आशितोष पाटील कोल्हापूरवर एकलांगीवर विजय मिळविला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत संकेत पाटील कोल्हापूरने प्रेम जाधव कंग्राळीचा हप्ते डावावरती विजय मिळविला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत गुत्याप्पा दावणगिरीने सचिन खोत सांगलीचा एकलांगीवर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने इंद्रजीत मुळे कोल्हापूरवर एकलांगीवर प्रेक्षणीय विजय मिळविला. त्याचप्रमाणे कुबेर पिरनवाडी, गगन अलारवाड, परसू हरिहर, सुमीत पाटील, अक्षय कडोली, शिवम कडोली, किसन कंग्राळी, करण खादरवाडी, महेश तिर्थकुंडे, अजित कंग्राळी, ओमकार कंग्राळी, भूमीपुत्र मुतगा, शुभम सातनाळी, प्रज्वल कडोली, शंकर संतिबस्तवाड, शिवम मुतगा, मंथन वडगाव, जयवंत बाळेकुंद्री, रितेश कडोली, स्वप्नील सावगाव, हरि काकती, पार्थ तिर्थकुंडे, गणेश गौंडवाड यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून विजय मिळविले.
आखाड्याचे पंच म्हणून चंद्रकांत डोंगरे, विश्वनाथ पाटील, प्रकाश मुधोळ, शिवाजी कडोली, वसंत पावले, सुधीर बिर्जे, बाळाराम पाटील, चेतन बुद्धण्णवर, बसवराज पाटील, राजू कुट्रे, रामचंद्र बाळेकुंद्री, बाहुबली पाटील, बाबू कल्लेहोळ, संतोष पाटील, रमेश मायाण्णाचे, राजू पाटील, बाळू मस्कार, लक्ष्मण डोंगरे, यशवंत कुट्रे यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन राजू मुचंडीकर, नारायण मुचंडीकर यांनी केले.