शहर परिसरात कार्तिकी एकादशी उत्साहात
ठिकठिकाणी दिंडींचे आयोजन : विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
बेळगाव : शहर परिसरामध्ये कार्तिकी एकादशी श्रद्धेने व मांगल्यपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकडारती सुरू असून गुरुवारी काकडारतीनंतर अभिषेक, पूजा, भजन आणि कीर्तन असे विविध कार्यक्रम झाले. शहरामध्ये शहापूर विठ्ठलदेव गल्ली येथे सर्वाधिक जुने असे विठ्ठल-रखुमाई मंदिर, नामदेव दैवकी संस्थेचे विठ्ठल मंदिर, खडेबाजार, बापट गल्ली येथील विठ्ठल मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटेच्या प्रहरी काकडारती झाल्यानंतर विठ्ठल भक्तांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त दिंडीही काढण्यात आली.
महाद्वार रोड तिसरा क्रॉस, येथील विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त एंजेल फौंडेशनच्या चेअरपर्सन मीनाताई बेनके यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली. पालखी सोहळा होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या. या मंदिरामध्ये महिनाभर काकडारती सुरू असून त्यामध्ये मृदंगकार हरिभक्त वैजू देवगेकर व वीणाधारी हरिभक्त दत्तू जट्टेवाडकर यांचा सहभाग आहे. मंदिरात कार्तिकीनिमित्त रात्री 8 ते 10 कीर्तन झाले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मारुती जोशिलकर यांच्यासह सदस्यांनी पालखी सोहळा, कीर्तनासाठी पुढाकार घेतला. महिला विद्यालय मराठी माध्यमतर्फे कॉलेज रोड, समादेवी गल्ली, गोंधळी गल्लीमार्गे दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी तुळशी रोपांसह दिंडीत सहभाग घेतला.