For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्तिक काकडा.... 3

06:45 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
कार्तिक काकडा     3
Advertisement

उठ पंढरीच्या राजा जाग वेळ झाला....................

Advertisement

थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला................’

अशा अभंगाच्या ओळी कानावर आल्या की समजावं काकडा सुरू झाला. हा काकडा फक्त देवळातच सुरु नसतो. तो निसर्गात सर्वत्र सुरू असतो. तो डोळे उघडून बघण्यासाठी आपण निघायचे असते.

Advertisement

सध्या आपण काकड आरती हरिपाठ याविषयी बोलतोय. हा ऐकण्यासाठी जाताना मात्र आम्हाला ज्या निसर्गाच्या सानिध्यात जायला लागतं ना तो निसर्ग बघता बघता आपण विचारात पडतो की निसर्गातसुद्धा काहीतरी अध्यात्म शिकायला मिळतं. कार्तिक महिना म्हणजे देखण्या नक्षत्रांचा महिना. पूर्वी दसऱ्यापासूनच थंडीचा गारवा जाणवायला सुरुवात व्हायची, पण सध्या प्रदूषणामुळे या सगळ्याचं तंत्र बिघडलेय. निसर्गसुद्धा माणसासारखा लहरी झालाय. मनाला येईल तसं वागायला लागलाय. उत्तर भारतात वसंत ऋतुचा महोत्सव तसाच आमच्या दक्षिण भागात शरदाचे मोठेपण जास्त. दिवस लहान असला तरी आकाशाचे सौंदर्य बघत राहावसे वाटते. इंदिरा संतांनी याचं वर्णन फार सुंदर केलंय.

‘दाटली साय ती स्निग्ध शुभ्र आकाशी,

फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी’ .....

या ऋतूतली देखणी फुलं म्हणजे झेंडू आणि शेवंती. गंध वेगळा पण सर्वत्र यांचंच राज्य. तिच्या शिवाय आदिमायेला शोभा नाही तर तुळशी विवाहाला शेवंती आणि झेंडू दोघे मिळून रंगत आणतात. झेंडूचा रुबाब अगदी एखाद्या खानदानी सौंदर्याचा तर शेवंती अगदी शालीन. मे महिन्यात जेवढा भाव आंब्याला तेवढाच भाव या ऋतूत या आवळ्यांनासुद्धा. खरंतर हे महिने म्हटले की थंडीत हुडहुडीत बसण्यापेक्षा निसर्गाची मजा लुटायला खूप देखणा काळ. काकडा आरतीला जाताना विविध रंगांनी फुलणारा निसर्ग बघण्यासारखा असतो. वेलीवरची सगळीच फुलं सुंदर दिसतात. चांदण्यांचा जणू त्या सतत अनुकरण करत असतात. या महिन्यापासून सुरू होणाऱ्या सर्व पौर्णिमा अगदी देखण्या आणि मनोहारी. दिवाळी पार पडली की त्रिपुरासुराच्या वधाची आठवण करून देणारी त्रिपुरारी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा...यातून सुखावणारे गोरगरीब या प्रकाशामुळे उजळून निघतात. शरदाचं चांदणं, माणसाप्रमाणे आकाश, झाडं, वेली या सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरतात. या महिन्यात सह्याद्रीचे डोंगर दऱ्या, पठार खऱ्या अर्थाने फुलतात. या सगळ्यांना पिवळी किनार लावण्याचं काम कॉसमॉसची करतात. अगदी हिरवागार शालू नेसलेल्या पृथ्वीच्या हळदीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावायला आलेली ही फुलं, न बोलता येतात आणि गुपचूप निघून जातात.

Advertisement
Tags :

.