कर्नाटकाचा केरळवर डावाने दणदणीत विजय
मोहसीन खानचे 6 बळी, करुण नायर ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / थिरुवनंतपूरम
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारी झालेल्या ब इलाइट गटातील सामन्यात कर्नाटकाने केरळचा एक डाव आणि 164 धावांनी दणदणीत पराभव करुन मोठा विजय नोंदविला. कर्नाटकाच्या मोहसीन खानने 29 धावांत 6 गडी बाद केले तर कर्नाटकाच्या पहिल्या डावात द्विशतक झळकविणारा करुण नायर ‘सामनावीर’ ठरला.
या सामन्यात कर्नाटकाने आपला पहिला डाव 5 बाद 586 धावांवर घोषित केला. करुण नायर आणि रविचंद्रन स्मरन यांनी शानदार द्विशतके झळकविताना चौथ्या गड्यासाठी 343 धावांची त्रिशतकी भागिदारी केली. कर्नाटकाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर केरळचा पहिला डाव 95 षटकात 238 धावांत आटोपला. बाबा अपराजितने एकाकी लढत देत 4 षटकार आणि 8 चौकारांसह 88 धावा झळकविल्या. सचिन बेबीने 31 तर रॉजरने 29 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या कविरप्पाने 4, विशाखने 3, शिखर शेट्टीने 2 आणि श्रेयस गोपालने 1 गडी बाद केला. कर्नाटकाकडून केरळला फॉलोऑन स्वीकारावा लागला.
केरळने बिनबाद 10 या धावसंख्येवरुन मंगळवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पण मोहसीन खानच्या फिरकी समोर केरळचा डाव 79.3 षटकात 184 धावांत आटोपला. केरळ संघातील शेवटच्या स्थानावर फलंदाजीस आलेला इडेन टॉमने 68 चेंडूत 7 चौकारासह 39, अहमद इम्रानने 2 चौकारांसह 23, कृष्णप्रसादने 5 चौकारांसह 33, कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 15 धावा जमविल्या. केरळला दुसऱ्या डावात 24 अवांतर धावा मिळाल्या. मोहसीन खानने 6 गडी बाद केले. तर कविरप्पाने 28 धावांत 2 तसेच शेट्टी आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कर्नाटकाने हा सामना बोनस गुणासह जिंकला.
संक्षिप्त धावफलक: कर्नाटक प. डाव 5 बाद 586 डाव घोषित, केरळ प. डाव सर्वबाद 238, केरळ दु. डाव 79.3 षटकात सर्वबाद 184 (इडेन टॉम 39, कृष्णप्रसाद 33, अहमद इम्रान 23, बाबा अपराजित 19, अवांतर 24, मोहसीन खान 6-29, कविरप्पा 2-28, शेट्टी व श्रेयस गोपाल प्रत्येकी 1 बळी).