कर्नाटकने पाचव्यांदा जिंकली विजय हजारे ट्रॉफी
वृत्तसंस्था/ वडोदरा
मयंक अगरवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकने विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर आपले नाव कोरले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कर्नाटकने रविचंद्रन स्मरणच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 348 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा डाव 48.2 षटकांत 312 धावांवर संपुष्टात आला. विदर्भाकडून ध्रुव शोरेने 111 चेंडूत 110 धावा केल्या, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. करुण नायरच्या नेतृत्वात विदर्भाने एकही सामना न गमावत अंतिम फेरी गाठली होती. संपूर्ण स्पर्धेत विदर्भाच्या फलंदाजांनी चमक दाखवली पण अंतिम फेरीत दबावाखाली त्यांची फलंदाजी कोसळली. परिणामी त्यांना जेतेपदापासून वंचित रहावे लागले. दुसरीकडे, कर्नाटकने मात्र पाचव्यांदा जेतेपद मिळवत स्पर्धेतील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. सामन्यात शतकी खेळी साकारणाऱ्या कर्नाटच्या रविचंद्रन स्मरणला सामनावीर तर मालिकेत 779 धावांची बरसात करणाऱ्या करुण नायरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.