कर्नाटक विजयी, , त्रिपुराचा दिल्लीला धक्का
वृत्तसंस्था / अहमदाबाद
देवदत्त पडिकलच्या नाबाद शतकाच्या जोरावर सय्यद मुश्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या ड गटातील सामन्यात कर्नाटकाने तामिळनाडूचा 145 धावांनी दणदणीत पराभव केला तर ड गटातील दुसऱ्या एका सामन्यात त्रिपुराने बलाढ्या दिल्लीला पराभवाचा धक्का दिला.
ड गटातील सामन्यात कर्नाटकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 बाद 245 धावा जमविल्या. त्यानंतर तामिळनाडूचा डाव 14.2 षटकांत 100 धावांत आटोपला. कर्नाटकाच्या डावात देवदत्त पडीकलने 46 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 102 तर शरथने 24 चेंडूत 53 तसेच रविचंद्रन स्मरणने 29 चेंडूत नाबाद 46 धावा झोडपल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटकाच्या अचूक गोलंदाजीसमोर तामिळनाडूचा डाव केवळ 100 धावांत आटोपला. तुषार रहेजाने 29 धावा केल्या. कर्नाटकातर्फे श्रेयस गोपाल आणि प्रवीण दुबे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
ड गटातील झालेल्या दुसऱ्या एका सामन्यात त्रिपुराने बलाढ्या दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्रिपुराने 20 षटकांत 5 बाद 157 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्लीने 20 षटकांत 8 बाद 145 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 12 धावांनी गमवावा लागला.
संक्षिप्त धावफलक: कर्नाटक 20 षटकांत 3 बाद 245 (देवदत्त पडीकल नाबाद 102, शरथ 53, स्मरण नाबाद 46, सोनु यादव 2-34), तामिळनाडू 14.2 षटकांत सर्वबाद 100 (तुषार रहेजा 29, श्रेयस गोपाल आणि प्रवीण दुबे प्रत्येकी 3 बळी),
त्रिपुरा 20 षटकांत 5 बाद 157 (मणीशंकर मुरासिंग नाबाद 25, सुयश शर्मा आणि राठी प्रत्येकी 2 बळी), दिल्ली 20 षटकांत 8 बाद 145 (नितीश राणा 45, मणीशंकर मुरासिंग 2-19).