कर्नाटक विजयी, गनीचे शतक वाया
वृत्तसंस्था/ पाटना
शकिबुल गनीने शानदार शतक नोंदविले असले तरी कर्नाटकविरुद्धच्या रणजी लढतीत तो बिहारला पराभवापासून वाचवू शकला नाही. कर्नाटकने या सामन्यात बिहारवर 8 गड्यांनी मात करीत या रणजी मोसमातील पहिला निर्विवाद विजय नोंदवला. विजयाच्या 6 गुणांसह कर्नाटकच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा बळावल्या आहेत.
कर्नाटकने 144 धावांची आघाडी घेतल्यानंतर 7 बाद 287 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि भेदक मारा करीत बिहारच्या दुसऱ्या डावात दोन्ही सलामीवीरांना केवळ 6 धावांत तंबूत पाठवले. 2022 मध्ये पदार्पणात त्रिशतक नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गनीने अनुभवी बाबुल कुमारच्या साथीने 130 धावांची भागीदारी करून कर्नाटकच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. बाबुलने 111 चेंडूत 44 धावा केल्या. गनीने झुंजार खेळ करीत 130 धावांची खेळी करताना 15 चौकार, 4 षटकार मारले. गनी शेवटच्या गड्याच्या रूपात बाद झाला. विद्याधर पाटीलने त्याला पायचीत करीत बिहारचा डाव 212 धावांत संपुष्टात आणला. कर्नाटकच्या श्रेयस गोपालने 70 धावांत 4 बळी मिळवित सामन्यात एकूण 8 बळी टिपले. याशिवाय विजयकुमार वैशाखने 44 धावांत 3 बळी टिपले. कर्नाटकला विजयासाठी 69 धावांचे किरकोळ आव्हान मिळाले, जे त्यांनी 10.1 षटकांत 2 गडी गमवित पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : बिहार 143 व 212 (शकिबुल गनी 130, बाबुल कुमार 44, श्रेयस गोपाल 4-70, वैशाख 3-44, कर्नाटक 7 बाद 287 व 10.1 षटकांत 2 बाद 70 (निकिन जोस नाबाद 28).