कर्नाटक-विदर्भ आज जेतेपदासाठी लढत
वृत्तसंस्था / बडोदा
2025 च्या क्रिकेट हंगामातील विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. या स्पर्धेत विदर्भचा कर्णधार करुण नायर याची फलंदाजी चांगलीच बहरली असल्याने कर्नाटकाच्या फलंदाजांना विदर्भला मोठ्या धावसंख्येपासून रोखावे लागेल.
विदर्भ संघाने आतापर्यंत चारवेळा विजय हजारे करंडकावर आपले नाव कोरले आहे. आता करुण नायर आपल्या नेतृत्वाखालील पाचव्यांदा जेतेपद विदर्भला मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. करुण नायरने या स्पर्धेत गेल्या सात सामन्यात 752 धावा जमविल्या आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात करुण नायर याने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला असून त्याने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा 660 धावांचा विक्रम मागे टाकला आहे. करुण नायरच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहिल. कारण भारतामध्ये होणाऱ्या आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी करुण नायर भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. करुण नायरला ध्रुव शोरे आणि यश राठोडकडून चांगली साथ मिळत आहे. विदर्भच्या या त्रिकुटाला लवकर बाद करण्यासाठी कर्नाटकाच्या गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. कर्नाटकाकडे कौशिक आणि अभिलाश शेट्टी त्याचप्रमाणे श्रेयस गोपाल हे प्रभावी गोलंदाज आहेत. कौशिकने आतापर्यंत 15 तर शेट्टीने 14 आणि श्रेयस गोपालने 18 गडी बाद केले आहेत.
कर्नाटकाचे नेतृत्व मयांक अगरवाल करीत असून त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 4 शतकांसह 619 धावा जमविल्या आहेत. 21 वर्षीय रविचंद्रन सिमरन, के. व्ही. अनिष आणि के. एल. श्रीजित, देवदत्त पडिक्कल हे कर्नाटक संघातील प्रमुख फलंदाज आहेत. हा अंतिम सामना चुरशीचा होईल, अशी आशा बाळगली जात आहे.