कर्नाटक, मुंबई संघांचे शानदार विजय
करुण नायरचा विश्वविक्रम, श्रेयस अय्यरचे दमदार शतक
वृत्तसंस्था / अहमदाबाद
2024-25 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या दमदार शतकाच्या जोरावर मुंबई संघाने पुडुचेरीचा 163 धावांनी दणदणीत पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर कर्नाटकाने सौराष्ट्रचा 60 धावांनी पराभव केला. विदर्भ संघातील करुण नायरने लिस्ट ए सामन्यात सर्वाधिक धावा जमविताना एकदाही बाद न होण्याचा विश्व विक्रम केला.
मुंबई विजयी
मुंबई आणि पुडुचेरी यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 50 षटकात 9 बाद 290 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पुडुचेरीचा डाव 27.2 षटकात 127 धावांत आटोपला. मुंबई संघातील कर्णधार श्रेयस अय्यरने 133 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारांसह नाबाद 137 धावांची खेळी केली. सिद्धेश लाडने 34, अंकोलेकरने 43 धावा केल्या. पुडुचेरीच्या अंकित शर्माने 36 धावांत 2 गडी बाद केले. पुडुचेरीच्या डावात आकाश करगेवीने 54 धावा जमविल्या. मुंबईतर्फे शार्दुल ठाकुरने 3 तर शेडगे आणि म्हात्रे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
करुण नायरचा विश्वविक्रम
विदर्भ संघातील अनुभवी फलंदाज करुण नायरने लीस्ट ए सामन्यात एकदाही बाद न होता सर्वाधिक धावा जमविण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. करुण नायरने या स्पर्धेतील गेल्या 4 सामन्यामध्ये एकदाही बाद न होता अनुक्रमे 112, 44, 163, 112 धावा नोंदविल्या. विजय हजारे करंडक स्पर्धेतील ड गटातील शुक्रवारच्या सामन्यात नायरच्या या शानदार कामगिरीमुळे विदर्भने उत्तर प्रदेशचा 8 गड्यांनी पराभव केला.
लीस्ट ए सामन्यामध्ये यापूर्वी म्हणजे 2010 साली न्यूझीलंडचा माजी अष्टपैलु जेम्स फ्रँकलीनने 527 धावांचा विश्वविक्रम नोंदविला होता. पण करुण नायरने 542 धावा जमवित फ्रँकलीनचा विश्वविक्रम मागे टाकला. लीस्ट ए सामन्यामध्ये जोशुआ व्हॅन हार्डीनने 512 धावा, फक्र झमानने 455 धावा, तौफिक उमरने 422 धावा जमविल्या आहेत. करुण नायरने या स्पर्धेत आपले चौथे शतक झळकविले आहे.
विदर्भ विजयी
करुण नायर आणि यश राठोड यांच्या नाबाद शतकांच्या जोरावर विदर्भने उत्तर प्रदेशचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने 50 षटकात 8 बाद 307 धावा जमविल्या. त्यानंतर विदर्भने 47.2 षटकात 2 बाद 313 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला. उत्तर प्रदेश संघातील माधव कौशिकने 41, समीर रिझवीने 105 धावा जमविल्या. विदर्भच्या भुतेने 65 धावांत 4 गडी बाद केले. त्यानंतर विदर्भच्या डावामध्ये यश राठोडने 140 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 138 तर करुण नायरने 101 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 112 धावा झळकविल्या.
कर्नाटकाची सौराष्ट्रवर मात
या स्पर्धेतील क गटातील सामन्यात कर्नाटकाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्रचा 60 धावांनी पराभव केला. कर्नाटकाने 50 षटकात 7 बाद 349 धावा केल्या. त्यानंतर सौराष्ट्रचा डाव 47.5 षटकात 289 धावांत आटोपला. कर्नाटकाच्या डावात मयांक अगरवालने 69, अनिशने 93 तर अभिनव मनोहरने नाबाद 44 धावा जमविल्या. सौराष्ट्रच्या धर्मेद्रसिंग जडेजाने 61 धावांत 3 गडी बाद केले. सौराष्ट्रच्या डावात हार्विक देसाईने 114 धावांचे योगदान दिले. पण त्याचे हे शतक वाया गेले. कर्नाटकातर्फे कौशिकने 51 धावांत 5 तर श्रेयस गोपालने 63 धावांत 4 गडी बाद केले.
पंजाबचा हैदराबादवर विजय
अहमदाबाद येथील अन्य एका सामन्यामध्ये पंजाबने हैद्राबादचा 80 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 50 षटकात 4 बाद 426 धावा जमविल्या. त्यानंतर हैद्राबादचा डाव 47.5 षटकात 346 धावांवर आटोपला. पंजाबच्या डावामध्ये प्रभसिमरन सिंग आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने 196 धावांची भागिदारी केली. प्रभसिमरन सिंगने 105 चेंडूत 3 षटकार आणि 20 चौकारांसह 137 तर अभिषेक शर्माने 6 षटकार आणि 7 चौकारांसह 72 चेंडूत 92 धावा जमविल्या. रमनदीप सिंगने 73 चेंडूत 80 धावा जमविताना 4 षटकार आणि 7 चौकार ठोकले. हैद्राबाद संघातील नितीश रे•ाrने 87 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह 11 धावा झळकविल्या. या स्पर्धेत आता ड गटात विदर्भने 5 सामन्यांतून 20 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून तामिळनाडू 14 गुणांसह दुसऱ्या तर उत्तरप्रदेश 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
उत्तराखंड, महाराष्ट्र विजयी
जयपूरमध्ये या स्पर्धेतील झालेल्या अ गटातील सामन्यात उत्तराखंडने झारखंडचा 4 गड्यांनी पराभव केला. उत्तराखंडतर्फे रवीकुमार समर्थने 104 धावा झळकविल्या तर उत्कर्ष सिंगने 38 धावांत 2 गडी बाद केले.
नवी मुंबई येथील झालेल्या सामन्यात महाराष्ट्रने आंध्रप्रदेशचा 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्र संघातील सिद्धेश वीरने नाबाद 115 धावांची खेळी केली.