कर्नाटक, महाराष्ट्र संघांचे डावाने विजय
वृत्तसंस्था/हुबळी, मुलानपूर
रणजी क्रिकेट स्पर्धेतील ब इलाईट गटातील हुबळी आणि मुलानपूर येथे झालेल्या सामन्यात मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी कर्नाटकाने चंदीगडचा एक डाव आणि 185 धावांनी तर महाराष्ट्राने पंजाबचा एक डाव आणि 92 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे आता ब गटात कर्नाटकाने गुणवारीत पहिले तर महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले आहे. कर्नाटक आणि चंदीगड यांच्यातील झालेल्या सामन्यात कर्नाटकाने आपला पहिला डाव 8 बाद 547 धावांवर घोषित केला. त्यानंतर कर्नाटकाने चंदीगडला पहिल्या डावात 222 धावांत गुंडाळले. चंदीगडच्या पहिल्या डावात मनन व्होराने नाबाद 106 धावा झळकविल्या तर कर्नाटकाच्या श्रेयस गोपालने 73 धावांत 7 गडी बाद केले.
कर्नाटकाकडून चंदीगडला फॉलोऑन स्वीकारावा लागला. चंदीगड संघाला दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करता आली नाही. कर्नाटकाच्या गोलंदाजांनी चंदीगडचा दुसरा डाव 33.5 षटकात 143 धावांत गुंडाळला. शिवम भांब्रीने 43 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या शिखर शेट्टीने 61 धावांत 5 तर श्रेयस गोपालने 45 धावांत 3 गडी बाद केले. कर्नाटकाच्या श्रेयस गोपालने या सामन्यात 10 गडी बाद केले. या सामन्यात कर्नाटकाला बोनस गुणांसह एकूण 7 गुण मिळाले. त्यामुळे ब गटात कर्नाटकाचा संघ पाच सामन्यांतून 21 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या सामन्यात कर्नाटकाच्या पहिल्या डावात दुहेरी शतक झळकविणारा रविचंद्रन स्मरणला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
महाराष्ट्र विजयी
ब गटातील मुलानपूरमध्ये झालेल्या रणजी सामन्यातील मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पंजाबचा एक डाव आणि 92 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात 350 धावा जमविल्यानंतर पंजाबचा पहिला डाव 58.4 षटकात 151 धावांत आटोपला. महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगीरगेकरने 44 धावांत 5 गडी तर रजनीश गुरबानीने 39 धावांत 4 गडी बाद केले. महाराष्ट्राने पंजाबला फॉलोऑन दिला. दरम्यान महाराष्ट्राच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबचा दुसरा डाव 40.5 षटकात 107 धावांत आटोपल्याने महाराष्ट्राने हा सामना डावाने आणि 92 धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्यात महाराष्ट्राला 7 गुण मिळाले. आता ब गटात महाराष्ट्र 5 सामन्यांतून 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
गोव्याला फॉलोऑन
राजकोटमध्ये सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी सौराष्ट्राकडून गोव्याला फॉलोऑन स्वीकारावा लागला. या सामन्यात सौराष्ट्रने पहिला डाव 7 बाद 587 धावांवर घोषित केला. त्यानंतर गोवा संघाने पहिल्या डावात 358 धावा केल्या. गोवा संघातील अभिनव तेजराणाने 118, ललित यादवने 59 तर राजशेखर हरिकांतने 69 धावा जमविल्या. सौराष्ट्राच्या डोडीयाने 98 धावांत 6 गडी बाद केले. गोव्याने फॉलोऑन स्वीकारल्यानंतर दिवसअखेर दुसऱ्या डावात 2 बाद 77 धावा जमविल्या होत्या.
केरळ सुस्थितीत
इंदौरमध्ये सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील सामन्यात मध्यप्रदेश विरुद्ध केरळची स्थिती मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी थोडीफार भक्कम झाली आहे. केरळने मध्यप्रदेशवर 307 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. या सामन्यात केरळचा पहिला डाव 281 धावांत आटोपल्यानंतर मध्यप्रदेशने पहिल्या डावात 192 धावा जमविल्याने केरळने 89 धावांची आघाडी मिळविली. केरळने दुसऱ्या डावात 62 षटकात 3 बाद 218 धावा जमविल्या. सचिन बेबी 81 तर बाबा अपराजित 85 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
- कर्नाटक प. डाव 8 बाद 547 डाव घोषित, चंदीगड प. डाव 222, चंदीगड दु. डाव 33.5 षटकात सर्वबाद 143.
- महाराष्ट्र प. डाव सर्वबाद 350, पंजाब प. डाव 151, पंजाब दु. डाव सर्वबाद 107.
- सौराष्ट्र प. डाव 7 बाद 587 डाव घोषित, गोवा प. डाव 358, गोवा दु. डाव 2 बाद 77.
- केरळ प. डाव 281, मध्यप्रदेश प. डाव 192, केरळ दु. डाव 3 बाद 218.