कर्नाटकाला 157 धावांची आघाडी
वृत्तसंस्था / पुणे
यजमान महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील इलाइट ब गटातील लढतीत सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी कर्नाटकाने महाराष्ट्रावर 157 धावांची आघाडी मिळविली आहे.
या सामन्यात कर्नाटकाचा पहिला डाव 313 धावांवर आटोपल्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या डावात 99.2 षटकात 300 धावा जमविल्याने कर्नाटकाला 13 धावांची नाममात्र आघाडी पहिल्या डावात मिळाली. त्यानंतर कर्नाटकाने तिसऱ्या दिवसाअखेर खेळाच्या दुसऱ्या डावात 5 बाद 144 धावा जमवित महाराष्ट्रावर 157 धावांची बढत घेतली आहे.
महाराष्ट्राने 6 बाद 200 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या चार गड्यांनी 100 धावांची भर घातली. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात सलामीच्या पृथ्वी शॉने 9 चौकारांसह 71, अर्शिन कुलकर्णीने 5 चौकारांसह 34 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 98 धावांची भागिदारी केली. कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राची मधली फळी कोलमडली. त्यांचा निम्मा संघ 139 धावांत बाद झाला. सचिन धसने 2 चौकारांसह 21, नवलेने 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. जलज सक्सेनाने चिवट फलंदाजी करत 147 चेंडूत 10 चौकारांसह 72 धावा झळकविल्या. ओसवाल आणि सक्सेना यांनी सातव्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. ओसवालने 2 चौकारांसह 20, घोषने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 36 धावा जमविल्याने महाराष्ट्राला 300 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्नाटकातर्फे श्रेयस गोपालने 70 धावांत 4 तर कविरप्पाने 74 धावांत 2 तर मोहसीन खानने 64 धावांत 3 गडी बाद केले.
13 धावांची आघाडी मिळविल्यानंतर कर्नाटकाने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली. अनिष आणि कर्णधार अगरवाल यांनी सलामीच्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. अनिषने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. के. श्रीजितने 5 चौकारांसह 29 धावा झोडपल्या. करुण नायर 1 चौकारांसह 15 धावांवर बाद झाला. सर्मन आणि अभिलाष शेट्टी हे प्रत्येकी 4 धावा जमवित तंबूत परतले. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने 70 धावांत 3 तर सक्सेना आणि ओसवाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: कर्नाटक प. डाव 111 षटकात सर्वबाद 313, महाराष्ट्र प. डाव 99.2 षटकात सर्वबाद 300 (सक्सेना 72, शॉ 71, कुलकर्णी 34, नवले 26, ओसवाल 20, धास 21, अवांतर 13, श्रेयस गोपाल 4-70, कविरप्पा 2-74, मोहसीन खान 3-64), कर्नाटक दु. डाव 49.4 षटकात 5 बाद 144 (अगरवाल खेळत आहे 64, श्रीजित 29, अनिष 17, करुण नायर 15, अवांतर 11, चौधरी 3-70, सक्सेना, ओसवाल प्रत्येकी 1 बळी).