Karnataka: कुमारस्वामींचा नवा ‘बॉम्ब’! काँग्रेसचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा
काँग्रेस नेत्याची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचा दावा
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसचा एक नेता केंद्रातील भाजप नेत्यांकडे 50 आमदारांना सोबत घेऊन येईन हे सांगण्यास गेल्याची माहिती आहे, असा नवा बॉम्ब माजी मुख्यमंत्री, निजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी टाकला आहे. बेंगळुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. गैरव्यवहारामुळे निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्याची धडपड हा काँग्रेस नेता करत आहे. सदर काँग्रेस नेता घोडेबाजारासाठी दिल्लीत पोहोचला होता, असे कोणाचेही नाव न घेता कुमारस्वामी यांनी आरोप केला.
कुमारस्वामी पुढे म्हणाले, सध्याच्या राजकारणात कोणाकडे निष्ठा किंवा प्रामाणिकपणा नाही. ते त्यांच्या सोयीनुसार पावले उचलतात. लोकसभा निवडणुकीनंतर या सरकारचे काय होणार हे राज्यातील जनतेला कळेल. महाराष्ट्रात जसे घडले तसे कर्नाटकात कोण याचे नेतृत्व करतील हे मला माहीत नाही. आजचे राजकारण पाहिले तर देशात काहीही होऊ शकते. कोठेही प्रामाणिकपणा आणि निष्ठा उरलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारवर केलेले आरोप मागे घेणार नाही. सर्व पुरावे ठेवूनच बोलणार आहे. बेळगाव येथे होत असलेल्या अधिवेशनात चांगली चर्चा व्हावी या उद्देशाने मी गप्प बसलो आहे. पेन ड्राईव्हसह अनेक मुद्दे बाजूला ठेवून दुष्काळ आणि उत्तर कर्नाटकच्या चर्चेला प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, केलेल्या आरोपांपासून पळून जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
स्वपक्षावर हल्लाबोल करणारे विधान परिषदेचे सदस्य बी. के. हरिप्रसाद हे एकमेव नाहीत, तर काँग्रेसमध्ये इतरही अनेक सदस्य आहेत. एक-एक नेत्यांचे आवाज बाहेर येणार आहेत. राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर ठेवून लढणार असल्याचे सांगत सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मुस्लीम समाजाला आकर्षित करण्याचे विधान करून राज्यातील लोकांना वाईट वाटेल, अशी परिस्थिती ते निर्माण करत असल्याचा टोला कुमारस्वामींनी लगावला.