कर्नाटक, केरळ खो खो स्पर्धेतील विजेते
वृत्तसंस्था / दावणगिरी
येथे झालेल्या 31 व्या वरिष्ठांच्या दक्षिण विभागीय पुरूष आणि महिलांच्या खो खो चॅम्पियनशिप स्पर्धेत केरळने पुरूष विभागातील तर यजमान कर्नाटकाने महिला विभागातील अजिंक्यपद पटकाविले.
अखिल भारतीय खो खो फेडरेशन तसेच कर्नाटक राज्य खो खो संघटना आणि दावणगिरी जिल्हा खो खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भरविली गेली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, केरळ आणि केंद्र शासित संघांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये एकूण 23 सामने खेळविले गेले. सदर सामने मॅटवर खेळविले गेले. पुरूषांच्या विभागातील झालेल्या अंतिम सामन्यात केरळने यजमान कर्नाटकाचा 30-27 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव करत विजेतेपद मिळविले. महिलांच्या विभागात कर्नाटकाने केरळचा 40-6 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.
या स्पर्धेमध्ये पुरूषांच्या विभागात केरळने विजेतेपद तर कर्नाटकाने उपविजेतेपद मिळविले. आंध्रप्रदेश तिसऱ्या, तेलंगणा चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या स्थानावर राहिले. महिलांच्या विभागात कर्नाटकाने विजेतेपद तर केरळने उपविजेतेपद पटकाविले. तामिळनाडूने तिसरे, तेलगंणाने चौथे तर आंध्रप्रदेशने पाचवे स्थान घेतले. या स्पर्धेत पुरूषांच्या विभागात तेलंगणाचा खो खो पटू जी. दिनेश हा सर्वोत्तम बचावत्मक खो खो पटू ठरला. आंध्रप्रदेशचा मारे शेट्टी हा सर्वोत्तम आक्रमक तर कर्नाटकाचा आदित्य पाटील सर्वोत्तम अष्टपैलु म्हणून घोषित करण्यात आले. केरळच्या बिचुला वीरा मदकनी नायक पुरस्कार मिळाला. महिलांच्या विभागात आंध्रप्रदेशची कुमारी ही सर्वोत्तम बचावपटू तर तामिळनाडूची जयश्री सर्वोत्तम आक्रमक खो खो पटू तसेच केरळच्या काव्या कृष्णाला सर्वोत्तम अष्टपैलु म्हणून निवडण्यात आले. कर्नाटकाच्या बी. चंद्राने ओनका ओबव्वा पुरस्कार मिळविला.