For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीचे ठिकाण

10:31 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीचे ठिकाण
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन : बेंगळूर टेक समिट-2025 चे उद्घाटन

Advertisement

बेंगळूर : सरकारचे स्पष्ट औद्योगिक धोरण, सुलभ परवानगी, कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि पूरक वातावरण यामुळे कर्नाटक हे भारतातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणुकीचे ठिकाण बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. बेंगळूर येथे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि जैविक तंत्रज्ञान खाते, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 28 व्या आवृत्तीच्या ‘बेंगळूर टेक समिट-2025’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तंत्रज्ञान परिषदेत कर्नाटक माहिती तंत्रज्ञान धोरण 2025-26, अंतराळ तंत्रज्ञान धोरण 2025-2030 आणि स्टार्टअप धोरण 2025-2030 या तीन प्रमुख धोरणांची रचना करण्यात आली.

आधुनिक तंत्रज्ञानाला पूरक कर्नाटक माहिती तंत्रज्ञान धोरणाद्वारे राज्यात नवोपक्रम आणि सखोल तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनविण्याचे ध्येय आहे. अंतराळ तंत्रज्ञान धोरण हे 2034 पर्यंत कर्नाटकाला भारतातील प्रमुख आघाडीचे अंतराळ तंत्रज्ञान केंद्र बनविण्यास मदत करेल. नव्या स्टार्टअप धोरणामुळे पुढील 5 वर्षात भांडवल गुंतवणूक समर्थन, बाजारपेठ प्रवेश, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास यासारख्या उपाययोजनांद्वारे 25,000 स्टार्टअप स्थापन करण्यास मदत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मागील तीन दशकांपासून बेंगळूरमध्ये आयोजित होणारी तंत्रज्ञानावर आधारित परिषद जगाचे लक्ष वेधून घेत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याने नवोपक्रम, तंत्रज्ञान संशोधन, निर्मिती आणि नव्या दिशेने पावले उचलण्यास व्यासपीठ बनत असल्याचा मला अभिमान वाटतो. या परिषदेत सहभागी होणारा प्रत्येक तज्ञ या व्यासपीठावर त्यांच्या ज्ञान आणि कौशल्यांचे विवरण करून राज्याचे भविष्य घडविण्यात परिवर्तनवादाची भूमिका बजावत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

कर्नाटक हे सर्वात मोठे संशोधन केंद्र

भारताच्या आयटी निर्यातीत कर्नाटक 42 टक्के योगदान देत आहे. याचे मूल्य 3.2 लाख कोटी रु. पेक्षा अधिक आहे. राज्यात 550 हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) असून ते भारतातील एकूण कंपन्यांपैकी एक तृतीयांश इतकी आहे.  बेंगळूर हे सेमीकंडक्टर, एरोस्पेस, संरक्षण, बायोटेक, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, अॅनिमेशन आणि गेमिंगसाठी प्रमुख केंद्र आहे. 1997 मध्ये आम्ही भारताचे पहिले तंत्रज्ञान धोरण तयार केले असून त्याचे नेतृत्व आजही सुरू ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान-प्रतिभा हे बेंगळूरचे आधारस्तंभ

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, तंत्रज्ञान आणि प्रतिभा हे बेंगळूरचे दोन आधारस्तंभ आहेत. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी, पॅरामेडिकल व वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आमचे सरकार नवोपक्रम, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि प्रतिभेला अधिक प्रोत्साहन देत आहे. आम्हाला तुमच्या समस्यांची जाणीवर आहे. त्यामुळेच राज्यात सर्वोत्तम पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

आयटी खात्याकडून एआयचलित ‘कियो’

राज्य सरकारने स्वस्त आणि अत्यंत लहान आकाराचा एआयचलित पर्सनल कॉम्प्युटर ‘कियो’ लाँच केला आहे. 18,999 रुपये किमतीचा कियो राज्यभरातील लोकांचे डिजिटल सक्षमीकरण करण्यास मदत करेल, असा विश्वास सरकारला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि बीटी खात्याने निओनिक्सच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘कियो’ पर्सनल कॉम्प्युटर विकसित केला आहे. बेंगळूर तंत्रज्ञान परिषदेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संगणकाचे अनावरण केले. या संगणकाचे डिझाईन आणि निर्मिती पूर्णपणे कर्नाटकात झाली आहे. राज्यातील डिजिटल उपलब्धतेतील तफावत भरून काढणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे.

ज्ञान आधारित (के), आर्थिक (ई) आणि मुख्य स्रोत (ओ) असे विस्तारित रूप असलेला हा संगणक विद्यार्थी समुदायाला अध्ययनास मदत करेल. लिनक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टम (ओएस)सह ओपन सोर्स आरआयएससी-व्ही प्रोसेसरचा त्यात समावेश आहे. फोर-जी वाय-फाय, इथरनेट, युएसबी-ए आणि युएसबी-सी पोर्ट, एचडीएमआय आणि ऑडिओ पॅकसह हे संगणक सुसज्ज आहे. यात ऑन-डिव्हाईस एआय कोरचा समावेश आहे. इंटरनेटच्या सुविधेशिवाय स्थानिक पातळीवर एआय ऑपरेट करण्यास ते सक्षम आहे. कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातही विद्यार्थ्यांना हे संगणक उपयुक्त ठरणार आहे.

‘क्विन सिटी’मध्ये सेमीकंडक्टर पार्क

आधुनिक उद्योगांचे महत्त्व ओळखून राज्य सरकार प्रस्तावित ‘क्विन सिटी’मध्ये 200 एकर जागेवर सेमीकंडक्टर पार्क निर्माण करणार आहे. या क्षेत्रातील कंपन्यांना येथे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. हे पार्क राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सर्व प्रकारच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी नवोन्मेष केंद्र म्हणून काम करेल.

- एम. बी. पाटील,अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री

Advertisement
Tags :

.