मी सोनिया गांधींना दिलेले वचन पुर्ण केले...हा जनादेश पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील
DK Shivkumar : काँग्रेस (Congress) नेते डीके शिवकुमार यांनी आज आपल्या आश्रूंना वाट मोकळी केली. कर्नाटक विधानसभेच्या ( Karnataka Election ) निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने अभुतपुर्व यश मिळवल्याने डीके शिवकुमार यांना आनंदाश्रू आले. तसेच आपण सोनिया गांधींना कर्नाटकात कॉंग्रेसला विजय मिळवून देण्याचे वचन पुर्ण केले असून हा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या विरोधातील असल्याचे ते म्हणाले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल आज होत असून कॉंग्रेसने अभुतपुर्व यश मिळवले आहे. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्य़क्ष डीके शिवकुमार यांनी मतदान केंद्राबाहेर माध्यमांशी संवाद साधला. अत्यंत भावूक होताना त्यांनी "मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकात कॉंग्रेसला विजयी करण्याचे वचन दिले होते. सोनिया गांधी मला तुरुंगात भेटायला आल्या होत्या हे मी विसरू शकत नाही." असे म्हणून त्यांनी आपल्या आश्रूना वाट करून दिली.
मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असलेले कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, "काँग्रेसचे कार्यालय हे आमच्यासाठी मंदिर आहे. काँग्रेस कार्यालयातच आम्ही पुढील दिशा ठरवू. तसेच मी सिद्धरामय्या यांच्यासह राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो." असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, "काँग्रेसचा हा मोठा विजय असून कर्नाटकातील जनतेला बदल हवा होता. हा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याविरोधातील आहे." असेही ते म्हणाले.