मोक्षाची वाटचाल सुरू करण्यासाठी कर्मयोग अधिक सोपा आहे
अध्याय चौथा
ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही मार्गांची माहिती बाप्पांनी वरेण्यराजाला दिल्यावर आपण कोणत्या मार्गाने जावे हे न कळल्याने तो गोंधळून गेला आणि त्याने बाप्पांना अशी विनंती केली की, कर्मांचा संन्यास आणि कर्मांचा योग या दोहोचे तुम्ही वर्णन केलेत. या दोहोंपैकी जो निश्चित श्रेयस्कर असेल तो मला सांगा. माणूस स्वत:च्या आयुष्यातले निर्णय ईश्वराच्या मदतीशिवाय स्वत: घेत असतो पण जेव्हा दोन अप्रिय गोष्टीतील एक निवडायची असते तेव्हा त्याला देवाचं किंवा घरातल्या वडील मंडळींचं मत हवं असतं. मनुष्य हा कुटुंबकबिल्यात रमणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला संन्यास किंवा निरपेक्षतेनं कर्म करणं या दोन्ही गोष्टी फारशा पसंत नसतात. मग त्याला देव आठवतो आणि या दोन्हीपैकी मी काय करू ते सांगा असे तो विचारतो पण देवही लगेच निर्णय न देता त्याला निरनिराळे पर्याय देऊन त्याच्या बुद्धीला चालना मिळेल अशी व्यवस्था करतात व अंतिम निर्णय तुझाच राहील असं सांगतात. राजाच्या प्रश्नामागची पार्श्वभूमी आपण समजाऊन घेतली. आता बाप्पांच्या मार्गदर्शनाचा अभ्यास पुढील श्लोकातून करू. माणसाला सगळं आयतं हवं असतं, हे बाप्पाही ओळखून आहेत. म्हणून ते राजाच्या प्रश्नाचं सरळ उत्तर न देता, पुढील श्लोकातून वस्तुस्थिती राजापुढं मांडतात व तूच काय तो निर्णय घे असं सुचवतात. ते म्हणतात,
क्रियायोगो वियोगश्चाप्युभौ मोक्षस्य साधने ।
तयोर्मध्ये क्रियायोगस्त्यागात्तस्य विशिष्यते ।। 2 ।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, कर्माचा योग आणि कर्माचा संन्यास हे दोन्ही मोक्षाची साधने आहेत. त्यामध्ये कर्माच्या त्यागापेक्षा कर्माचा योग विशेष अथवा अधिक श्रेयस्कर आहे. विवरण- बाप्पा म्हणाले, राजा कर्मयोग आणि कर्मसंन्यास ही दोन्ही मोक्षाचीच साधने आहेत पण कर्मयोग सहज सुलभ असल्याने अधिक सोयीचा आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने मोक्षाची वाटचाल सुरू करण्यासाठी कर्मयोग अधिक सोपा आहे. कर्मसंन्यास घेण्यासाठी आंतरिक तीव्र वैराग्य तसेच यमनियम, शमदमादी दृढ साधन संपत्तीची आवश्यकता असते. थोडक्यात सर्व पूर्वतयारीनिशी कर्मत्याग केल्यासच त्याचं अपेक्षित फळ म्हणजे मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात कोणताही बदल नको असे वाटणे. पूर्वतयारी शिवाय जगावर नाराज होऊन, जगाच्या त्रासाला कंटाळून जो मनुष्य संन्यास घेईल आणि आता मी काहीही न करता स्वस्थ बसणार आहे असं म्हणेल तो काही काळ स्वस्थ बसेल पण स्वस्थ बसला तरी पूर्वतयारी नसल्याने त्याचं मन चुळबूळ करू लागेल. कारण त्याच्या मनातील विचार व त्याला अनुरूप होणाऱ्या इच्छा थांबलेल्या नसतात. मग त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तो कर्म करायला तयार होईल व त्यानं घेतलेल्या संन्यासाचे बारा वाजतील.
पण जो कर्मयोगाचे आचरण करणारा निरपेक्ष बुद्धीने लोककल्याणकारी कार्य करत राहील व ते कार्य ईश्वराने त्याला दिलेलं कार्य आहे असं समजून ते पूर्ण झालं की, ईश्वराला अर्पण करेल. त्यामुळे त्या कार्याचं फळ कोणतं मिळतंय हे त्याच्या डोक्यात नसेल. करत असलेल्या कर्माच्या फळाचा विचार मनात नसल्याने तसेच आपण ईश्वराने दिलेलं काम करतोय या विचाराने त्याला कर्म करतानाही आनंद मिळत असतो. हा आनंद निर्भेळ असल्याने त्याची गोडी काही औरच असते. आई जेव्हा तिच्या बाळाचं सर्व प्रेमाने करत असते तेव्हा तिला जरूर आनंद मिळतो पण ते प्रेम थोडेसे स्वार्थमूलक असते. कर्मयोगी मात्र कोणत्याही अपेक्षेशिवाय कर्म करत असल्याने त्याला मिळणारा आनंद आईच्या आनंदापेक्षा मोठा असतो.
क्रमश: