अमेरिकेतील निवडणुकीची उत्सुकता
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता अगदी जवळ आली आहे. त्या देशातील नियमानुसार दर प्रत्येक चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या प्रथम मंगळवारी ही निवडणूक होत असते. त्यामुळे आता या महत्वपूर्ण निवडणुकीला दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. अमेरिका ही आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या जगातील प्रथम क्रमांकाची महाशक्ती आहे. या देशातल्या राजकारणावर जगाचे राजकारण ठरत असते, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर साऱ्या जगाचे लक्ष असते. भारतही त्याला अपवाद नाही. अलीकडच्या काळात भारताला अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत जे स्वारस्य निर्माण झाले आहे, त्याला एक बदलत्या जागतिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जवळपास 40 वर्षे जगाने अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध अनुभवले. त्यावेळी भारत हा रशियाच्या गोटातील देश होता. त्यामुळे अमेरिकेत कोणीही नेता राष्ट्राध्यक्ष झाला, तरी अमेरिकेच्या भारतासंबंधीच्या आणि भारताच्या अमेरिकेसंबंधीच्या धोरणांमध्ये विशेष फरक पडत नसे. म्हणून अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक हा भारतासाठी ‘दुरुन पाहण्याचा खेळ’ असे. पण 1990 नंतर रशियातील साम्यवादी राजवटीचे पतन झाले आणि शीतयुद्धाची तीव्रता कमी झाली. तसेच जागतिक समीकरणेही बदलली. भारताला अमेरिकेशी जुळवून घेणे क्रमप्राप्त ठरले. इसवीसन 2000 नंतरच्या काळात चीन प्रबळ झाला आणि त्याची महत्वाकांक्षाही वाढली. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांचे हितसंबंध एकमेकांच्या आड येऊ लागले. परिणामी, अमेरिकेलाही भारताचे महत्व पटू लागले. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले. पूर्वी या दोन देशांमधील संबंध तात्विक किंवा थिअरॉटिकल होते, ते अलीकडच्या काळात बदलत्या जागतिक-राजकीय परिस्थितीमुळे व्यवहारी किंवा प्रॅक्टिकल झाले आहेत. आज भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे धोरणात्मक भागिदार झाले असून त्यांच्यातील व्यापार, भारताकडून होणारी अमेरिकन शस्त्रांची खरेदी, तंत्रज्ञान आणि गुप्त माहितीचे आदानप्रदान, गुंतवणूक इत्यादी आयाम या भागीदारीला मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक भारतासाठीही महत्त्वाची ठरते. यावेळी ही निवडणूक रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यात रंगली आहे. भारताप्रमाणे अमेरिकेतही मतदानपूर्व सर्वेक्षणांचा सुळसुळाट आहे. ही सर्वेक्षणे करताना भारतात जसा पक्षपात होतो किंवा केला जातो, तसा प्रकार अमेरिकेतही दिसून येतो. त्यामुळे काही सर्वेक्षण संस्था डोनाल्ड ट्रंप यांचे पारडे जड असल्याचे दर्शवितात, तर काही हॅरिसना संधी असल्याचे दाखवितात. भारतात ज्याप्रमाणे अशी सर्वेक्षणे कित्येकदा कमी अधिक प्रमाणात चुकीची ठरतात, तसे अमेरिकेतही होताना दिसते. त्यामुळे अशा सर्वेक्षणावरुन कोण विजयी होणार हे छातीठोकपणे सांगता येत नाही. तथापि, कोण विजयी झाल्यास काय परिणाम होईल याविषयी काही ठोकताळे मांडता येतात. या दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी कोण विजयी झाल्यास भारतावर काय परिणाम होईल, हा अभ्यासकांच्या औत्सुक्याचा विषय आहेच. त्याशिवाय जगावर कोणता परिणाम होईल, यावरही बरीच चर्चा होत आहे. सध्या इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात घनघोर संघर्ष होत आहे. डोनाल्ड ट्रंप विजयी झाल्यास इस्रायलची बाजू अधिक बळकट होण्याची शक्यता सरसकट व्यक्त केली जात आहे. कारण ट्रंप यांचे सौदी अरेबियाशी सख्य असले तरी इराणला त्यांच्या पक्षाचा डेमॉक्रेटिक पक्षापेक्षाही अधिक कडवा विरोध आहे. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे पितृत्व इराणने स्वीकारले असल्याने ट्रंप फारशी दयामाया दाखविणार नाहीत, अशी सर्वसामान्य समजूत आहे.
डेमॉक्रेटिक पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनीही इस्रायलला या संघर्षात हातचे काहीही राखून न ठेवता साहाय्य केले आहे, त्याचे कारण अमेरिकेतील बळकट इस्रायल समर्थक ज्यू लॉबी हे आहे. या लॉबीचा अमेरिकेच्या राजकारणावर प्रभाव असल्याचे दिसून येते. ट्रंप विजयी झाल्यास इस्रायलच्या दृष्टीने ती ‘विन विन सिच्युएशन’ ठरणार आहे. हॅरिस विजयी झाल्यासही इस्रायलला अमेरिका वाऱ्यावर मुळीच सोडून देणार नाही किंवा त्या देशाचे हात बांधून ठेवणार नाही. तथापि, शाब्दिक का असेना, पण थोडेफार नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाईल, जसा याच पक्षाच्या बराक ओबामा यांच्या काळात केला गेला होता. ट्रंप विजयी झाल्यास रशियासंबंधी आणि युक्रेन संघर्षाविषयी त्यांची भूमिका काय असेल हा विशेष प्रकाशात न आलेला विषय आहे. हॅरिस निवडून आल्यास त्या रशियाविरोधात कठोर भूमिका घेणे शक्य आहे. भारताविषयी सांगायचे, तर रिपब्लिकन पक्ष भारताच्या बाजूचा आणि डेमॉव्रेटिक पक्ष भारतासंबंधी साशंक, अशी सरळधोप आणि बाळबोध मांडणी काही विचारवंत करतात. इतकेच नव्हे, तर हॅरिस विजयी व्हाव्यात. म्हणजे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेसण घालतील, असे एक दिवास्वप्न आपल्याकडील स्वत:ला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे विचारवंत पहात आहेत. असेच स्वप्न बराक ओबामा अध्यक्ष झाले तेव्हा याच विचारवंतांकडून पाहिले गेले होते. पण ते सत्यात उतरले नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबामा यांनी एकमेकांशी व्यवस्थित जुळवून घेतल्याचे दिसून आले. इतके की ओबामा यांच्या पुढाकाराने भारताला ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजीम’ (एमटीसीआर) या महत्वपूर्ण जागतिक संघटनेचे सदस्यत्व प्राप्त झाले अशी चर्चा होती. तसेच अनेक महत्वपूर्ण शस्त्रखरेदी आणि धोरणात्मक करार करण्यात आले. डोनाल्ड ट्रंप विजयी झाले तर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेतील ही निवडणूक भारतासाठीही निश्चितच महत्त्वाची आहे. डोनाल्ड ट्रंप आणि कमला हॅरीस यांच्यातील चुरशीच्या स्पर्धेचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, यासंबंधीचे चित्र पुढच्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल.