महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निरपेक्ष कर्म करणाऱ्याने कर्मयोग घोटून घोटून गिरवलेला असतो

06:47 AM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

काही लोक काम टाळण्यासाठी संन्यास घेतो असं म्हणतात पण ह्या पद्धतीने अंगचोरपणा करण्याला संन्यास मुळीच म्हणत नाहीत. संन्यासी व्यक्तीला मनापासून संसाराची आवड नसते. त्यामुळे संसाराचा, संसारिक कर्मांचा त्याग त्यांच्याकडून स्वाभाविकपणे घडतो. कर्मयोग आचरणारा मनुष्य संसारात राहून कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करत असतो. जेव्हा त्याच्या मनात कर्मफळाचा त्याग करण्याचा दृढनिश्चय होतो तेव्हा तो संसारात असूनसुद्धा हळूहळू मनाने संन्यासी होऊ लागतो.  त्याला कुणाकडून कोणतीच अपेक्षा उरलेली नसते. कर्तव्यकर्मे करावीत आणि बाजूला व्हावं असा त्याचा सहजस्वभाव होतो. संसारात राहून सुद्धा कर्मयोगी, संन्यासीवृत्तीने रहात असल्याने संन्याशाला मिळणारा मोक्ष त्यालाही मिळतो.

Advertisement

कर्तव्य निरपेक्षतेनं पार पाडत असलेला मनुष्य पापरहित, शुद्ध चित्त असून आत्मस्वरूप जाणल्याने इंद्रिये जिंकलेला असतो. तो योगतत्पर असल्याने कर्म करीत असला तरी त्याने लिप्त होत नाही. असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

निर्मलो यतचित्तात्मा जितखो योगतत्परऽ ।

आत्मानं सर्वभूतस्थं पश्यन्कुर्वन्न लिप्यते  ।।7 ।।

अर्थ-पापरहित, शुद्ध चित्त असलेला व आत्मा जिंकलेला, इंद्रिये जिंकलेला, योगतत्पर व आपल्यासारखाच आत्मा सर्व भूतांचे ठिकाणी आहे असे पाहणारा कर्म करीत असला तरी त्याने लिप्त होत नाही.

विवरण-बाप्पांनी सांगितल्यानुसार कर्मयोग आचरायला सुरवात केल्यावर मनुष्यात हळूहळू बदल होऊ लागतो. हा बदल मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने अनुकूल असतो. कर्मयोगाची सुरवात कोणतीही अपेक्षा न बाळगता कर्म करायचं आहे या विचारसरणीतून होते. कर्म करून त्यापासून अव्वाच्यासव्वा अपेक्षा बाळगण्याची अनेक जन्मांची सवय माणसाला असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा मनुष्य अपेक्षा बाळगतो. ही अपेक्षा बाळगण्याची सवय सहजासहजी सुटणं अवघड असतं. अपेक्षा बाळगण्यातून, कित्येकवेळा अपेक्षा भंगाचं दु:खही पदरात पडतं. हे लक्षात आलं की, मनुष्य दरवेळी करत असलेल्या कर्मापासून आपण कोणतीही अपेक्षा बाळगायची नाही हे मनाला बजावून सांगू लागतो. त्यातून काहीवेळा लोक आपला उघड उघड गैरफायदा घेतायत हे लक्षात आलं की, चिडचिड होते, नैराश्य येतं. काहीवेळा अजाणतेपणी अपेक्षा बाळगून कर्म सुरू केलं जातं मग अपेक्षा करायची नाही हे लक्षात आल्यावर अपेक्षा सोडून दिल्या जातात. हळूहळू निरपेक्षतेनं कर्म करायची माणसाला सवय लागू लागते. ही अशी सवय लागणं फार महत्त्वाचं आहे. ही सवय मनात पक्की झाली की, निरपेक्षतेनं कर्म करणं हा माणसाचा स्वभाव बनून जातो. मग त्याला आपण निरपेक्षतेनं कर्म करायचंय असं लक्षात ठेवायला लागत नाही. आपल्याला असे परोपकारी गोपाळ कदाचित भेटलेही असतील व ते करत असलेल्या निरपेक्ष कर्माबाबत आपल्याला आश्चर्यही वाटलं असेल पण मनुष्य जेव्हा असं निरपेक्षतेनं कार्य करू लागतो तेव्हा त्याला मिळणारा आनंद कधीही न संपणारा असतो हे आपल्या लक्षात येत नाही. असा न संपणारा आनंद निरपेक्षतेनं कर्म करणाऱ्या व्यक्तीला का मिळतो ते बाप्पा या श्लोकात सांगतात. ते म्हणतात, असा स्वभावत: निरपेक्ष कर्म करणाऱ्या मनुष्याने कर्मयोग घोटून घोटून गिरवलेला असल्याने तो मनाने निर्मळ असतो. स्वत:च्या बुद्धीवर त्याचा ताबा असतो. त्यानं इंद्रियांवर जय मिळवलेला असतो. हे सर्व साध्य केलेलं असल्याने त्याला अक्षय्य आनंदाची प्राप्ती झालेली असते. हा चमत्कार निरपेक्षतेनं करत असलेल्या कर्मातून साधलेला असतो. त्याला सर्वांच्यात आपल्यासारखाच ईश्वरी अंश असलेला आत्मा आहे याची त्याला जाणीव झालेली असते.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article