कराटे खेळातील प्रतिभावंत... वेद आकारकर
कराटे या जिगरी खेळात लहान वयातच प्राविण्य संपादन केलेल्या वेद देवेंद्र आकारकर या म्हार्दोळ येथील मुलाने राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कराटे अजिंक्यपद स्पर्धेत आपले कसब सिद्ध केले आहे. मॅरेथॉन आणि सांस्कृतिक क्षेत्रातही प्रियोळच्या शिक्षा सदन हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या वेदला आता गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर नाव कमवायचयं. वेदचे वडील देवेंद्र आकारकर हे सुद्धा एक उत्कृष्ट क्रीडापटू. मॅरेथॉन तसेच अन्य खेळातही त्यांनी नाव कमावले आहे. घरात खेळाचे वातावरण असल्याने वेदही हमखास खेळात ओढला गेला. वयाच्या सातव्या वर्षी कराटे खेळाच्या प्रशिक्षिका सुरेखा कुंकळ्योंकर यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण वेदने घेण्यास सुरूवात केली. प्रशिक्षक कुंकळ्योंकर यांच्या कुशल प्रशिक्षणाखाली वेदने ओकिनावा मार्शल आर्ट अकादमीच्या कराटे खेळातील इलो, ऑरेंज, ग्रीन, ब्लू व ब्लू -दोन हे बॅल्ट मिळविले आहेत. कराटेत गोव्याचे आंतर राज्य स्पर्धेत प्रतिनिधीत्व करताना वेदने 2022 मध्ये नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या कराटेमध्ये सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर लगेच ज्युनियर गटातील कुमितेत रौप्यपदक प्राप्त केले.
या दोन पदकांनंतर वेदचा कराटेतील खेळ बहरला. त्याच वर्षी नावेलीत टीकेएजीने आयोजित केलेल्या दक्षिण गोवा जिल्हा कराटे अजिंक्यपद स्पर्धेत वेदने 8 वर्षांखालील डब्लूवायओ बॅल्ट काटा व कुमिते विभागात सुवर्णपदके जिंकली. दक्षिण गोवा जिल्हा पातळीवरील स्पृहर्णीय यशामुळे वेदने राज्यपातळीवरील कराटे स्पर्धेत खेळण्याची पात्रता मिळविली. या स्पर्धेत अव्वल कराटेपटूंशी लढत वेदने म्हापसातील पेडे इनडोअर संकुलात झालेल्या स्पर्धेत 8 वर्षांखालील कुमिते गटात रौप्यपदक मिळविले. वेदची कराटे स्पर्धेतील कामगिरी नंतर बहरत गेली. फोंडा येथील क्रीडा संकुलात मुख्य इन्स्ट्रक्टर सुरेखा कुंकळ्योंकर यांनी आयोजित केलेल्या ओएमएए आमंत्रितांच्या कराटे स्पर्धेत वेदने ऑरेंज बॅल्ट स्पॅरिंगमध्ये ब्राँझ तर ऑरेंज बॅल्टच्या काटा प्रकारातील लढतीत अव्वल स्थान मिळवून सुवर्णपदक मिळविले.
कराटे खेळाबरोबर मॅरेथॉन हा क्रीडा प्रकारही वेद आकारकरचा आवडता खेळ आहे. मंगेशीच्या मांगिरीष यूथ क्लब आणि सिद्धिविनायक म्हालसा कला संघ या आकार-म्हार्दोळच्या संस्थेने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती यशस्वीपणे पूर्णही केली आहे. सांस्कृतिक क्षेत्रातही वेदची कामगिरी थक्क करणारी असून फॅन्सी ड्रेस, मनाचे श्लोक, हस्तलिखित लेखन, चित्रकला तसेच एकपात्री प्रयोग स्पर्धांत भाग घेऊन वेदच्या नावावर कित्येक बक्षीसे आणि पदकेही आहेत. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू-मनालीत तर त्याचा आणि त्याचे आजोबा गोव्याचे प्रसिद्ध लोककलाकार कांता गावडे यांचा हिमाचलप्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते गौरवही करण्यात आला आहे. 2023 मध्ये जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिंन्हा यांनीही वेदच्या प्राविण्याबद्दल गौरव केला आहे. घुमट, शामेळ, ढोल आणि काशाळे या संगीत वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या वेद आकारकरच्या अष्टपैलूत्वाची दखल घेऊन त्याला फातोर्डाच्या दी गुड शेपर्ड ऑर्गानायझेशन, नावेलीच्या दिया ऑर्गानायझेशन आणि म्हार्दोळच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्टने गौरविले आहे.
-संदीप मो. रेडकर