For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करंबळ-चापगाव रस्त्याची दुर्दशा,रस्त्यावरून प्रवास धोकादायक

12:30 PM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
करंबळ चापगाव रस्त्याची दुर्दशा रस्त्यावरून प्रवास धोकादायक
Advertisement

खानापूर : करंबळ-चापगाव रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून संपूर्ण रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्यावरील खडी उखडल्याने या रस्त्यावरुन वाहन चालवताना धोक्याचे आणि गैरसोयीचे झाले आहे. रस्त्याची खडीच उखडून गेल्याने  या भागातील नागरिकांसह प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांतून होत आहे.

Advertisement

प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या करंबळ ते चापगाव या 7 कि. मी. रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून 6 कोटी 72 लाखाचा निधी मंजूर झाला होता. 2020 पासून सातत्याने पाठपुरावा केल्याने 2022 मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याची देखभाल पुढील पाचवर्षे कंत्राटदारानेच करण्याचे आहे. मात्र अवघ्या तीन वर्षातच संपूर्णच 7 कि. मी. रस्त्यावरील खडीच उखडून गेली आहे. तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे.

चापगाव परिसरातील कोडचवाड, वड्डेबैल, चिक्कदिनकोप, कग्गणगी,अवरोळी या ग्रामीण भागातील लोकांना खानापूरला येण्यासाठी हा रस्ता कमी अंतराचा आणि सोयीचा असल्याने या रस्त्यावरुन प्रवासांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा रस्ता झाल्यानंतर लालवाडी, कारलगा तसेच यडोगा या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे कमी होऊन चापगाव-जळगा-करंबळ याच रस्त्यावरुन वाहतूक होत आहे.

Advertisement

यापूर्वी कंत्राटदाराने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम केले होते. तसेच संपूर्ण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने या रस्त्याची खडी उखडून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक धोकादायक बनली आहे. नागरिकांना नाईलाज म्हणून या रस्त्यावरुन धोका पत्करुन वाहतूक करावी लागत आहे. कंत्राटदाराने पाच वर्षे या रस्त्याची देखभाल करणे असा नियम आहे. त्याप्रमाणे कंत्राटदाराने हा रस्ता तातडीने पुन्हा दुरुस्त करून या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करावे, अशी मागणी चापगाव परिसरातील नागरिकांसह प्रवाशांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.