Karad Politics: कराड दक्षिण मतदारसंघ बनतोय प्रयोगशाळा, कॉंग्रेस अन् भाजप आमनेसामने
दुबार मतदानाचा मुद्दा राज्य पातळीवर तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे
By : देवदास मुळे
कराड : मत चोरीच्या मुद्यावरून देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खळबळ उडवून दिली आहे. याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना सातारा जिह्यातील कराड दक्षिण मतदारसंघ याच मुद्याची काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रयोगशाळा बनत असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून दक्षिणच्या वाढीव आणि दुबार मतदानाचा मुद्दा राज्य पातळीवर तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान दक्षिण कराड मतदारसंघात 18 हजार मतदान वाढले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने दक्षिणमधील चार हजार मतदारांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. यापैकी केवळ 10 हरकती मान्य करून 3990 हरकती फेटाळण्यात आल्या. त्यानंतर दक्षिणच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. तो तब्बल 38 हजार मतांनी झाला. त्यामुळे वाढीव मतदान हा मुद्दा वादग्रस्त बनला होता.
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असताना ईव्हीएम मशीनबाबत राज्यात विरोधकांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या समिती अध्यक्षपदी निवड केली होती.
त्यातच राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा जोरकसपणे मांडला. यावरून देशभरात चर्चा होत असताना कराड दक्षिण मतदारसंघात कापील गावात 9 मतदारांनी या गावाचे रहिवासी नसताना अपुऱ्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे मते नोंदवत मतदान केल्याने या मतदारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 9 दिवस गणेश पवार यांनी उपोषण सुरू केले.
सुरूवातीला नसले तरी चार दिवसांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. दक्षिणमधील बोगस मतदानाच्या चौकशीची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात पृथ्वीराज चव्हाण हेही दक्षिणमधील वाढीव मतदानाचा अभ्यास करून राज्य पातळीवर यातील व्होट चोरीचे सादरीकरण करणार असल्याचे वृत्त पसरले होते.
या पार्श्वभूमीवर दक्षिण भाजपने या मुद्यात थेट उडी घेतली. सुरूवातीला चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाचे दुबार नाव असून त्यांनी दोन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप केला. तर दोन दिवसांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबीयांची दुबार नावे असून त्यांनीही दुबार मतदान केल्याचा आरोप केला.
याबाबतची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मत चोरी कोण करतंय हे राहुल गांधी यांनी पाहावे, अशी प्रतिक्रिया दिली होती. पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट करून मत चोरीचा मुद्दा महाराष्ट्रात काउंटर करण्याचा प्रयत्न भाजपने केला गेला.
काँग्रेसने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या स्वीय सहाय्यकाचे दोन ठिकाणी मतदान असल्याचा आरोप केला आहे. या मुद्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले असून आरोप-प्रत्यारोप तसेच खुलासे होत आहेत. वाढीव मतदानाचा मुद्दा आणखी काही दिवस तापता राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही याचे पडसाद उमटत राहणार आहेत.