येळ्ळुरात कराड-पिंजर आगीत जळून खाक
50 हजारचे नुकसान : पुन्हा गवत जमा करेपर्यंत नाकीनऊ येणार
वार्ताहर/येळ्ळूर
भर वस्तीत असलेल्या श्री हरी कॉलनीतील सुरज गोरल व नेताजी गोरल यांचे दोन ट्रॅक्टर कराड व एक ट्रॅक्टर पिंजराच्या गंजा अज्ञातानी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर घटना बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सूरज गोरल व नेताजी गोरल यांचा श्री हरी कॉलनी येळ्ळूर येथे म्हशींचा गोठा आहे. त्यानी रोजच्या वापरासाठी आणि उन्हाळ्यातील साठवणीसाठी वैरण रचून ठेवली होती. रात्री आठ वाजता गोठ्यातील सर्व कामे आवरून गोरल कुटुंबीय घरी परतल्यावर वस्तीला कोणी नसल्याचे पाहून अज्ञात्यानी हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे त्या शेतकऱ्यांना नाहक फटका बसला असून, त्यांना पुन्हा वैरणीची जमवाजमव करावी लागणार आहे. या आधीही येळळूर शिवारात भाताच्या गंजाना आग लावून जाळण्याचा प्रकार घडला आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. भर वसतीत अशी घटना घडल्यामुळे नागरिकांनी आता जागृत रहाणे गरजेचे आहे.