Karad : कराड नगरपरिषद निवडणूक: पाच अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार
नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची माघारी
कराड : कराड नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून गुरुवारी पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी २१ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पर्यंत आहे.
नगराध्यक्षपद निवडणूकीसाठी एकुण १७ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर नगरसेवकपदासाठी एकुण २५९ उमेदवारांचे अर्ज आहेत. मंगळवारी दाखल अर्जाची छाननी झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्यास मुदत देण्यात आली आहे. दरम्यान गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या एकाही उमेदवाराने अर्ज माघार घेतला नाही, तर नगरसेवक पदाच्या पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २ ब मधून विनायक कदम (अपक्ष), प्रभाग ३ अ मधून वंदना देशमुख (अपक्ष), प्रभाग ६ अ मधून सपना ओसवाल (अपक्ष), प्रभाग ७ ब मधून अभिषेक बेडेकर (अपक्ष) व प्रभाग १५ ब मधून श्रीधर फुटाणे (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडून मागे घेतले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे आज आणखी काही उमेदवार आपले अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. दुपारी तीननंतर कराड नगरपालिका निवडणूक रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे अर्ज माघारीकडे बारीक लक्ष आहे.