Karad : कराडचे कृषी प्रदर्शन पालिका निवडणुकांमुळे लांबणीवर !
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कराड कृषी प्रदर्शन लांबणीवर
कराड : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रतिवर्षी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सब आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरऐवजी हे प्रदर्शन लांबणीवर पडणार आहे.
शुक्रवारी सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे आणि विविध शासकीय विभाग यांची आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या पालिका निवडणुका संपल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याही निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढील बैठक घेऊन निश्चित करू, असे सांगितले.
प्रदर्शनाची पुढील नवीन तारीख निश्चित झाल्यानंतर कळविण्यात येईल याची शेतकरी, नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समितीमार्फत करण्यात आले आहे.