कोल्हापूरचे जागृत देवस्थान ग्रामदैवत कपिलेश्वर
कोल्हापूर :
कोल्हापूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर शिवलिंग जागृत देवस्थान आहे. साडेतिनशे वर्षापुर्वी कपील मुनींनी आराधना करून कपिलेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी वासुदेव शिवराम धर्माधिकारी यांच्या घराण्याला पुजेचा अधिकार दिला. तेंव्हापासून आजतागायत धर्माधिकारी कुटुंब या मंदिराचे व्यवस्थापन करीत आहेत. सध्या सातव्या पिढीतील नचिकेत नारायण धर्माधिकारी पूजेची जबाबदारी सांभळत आहेत.
कपिलतीर्थाजवळ कपिल मुनिनी हे शिवलिंग स्थापन केले म्हणून या शिवलिंगाला कपिलेश्वर असे म्हणतात. या मंदिराला कोल्हापूरचे ग्रामदैवत माणले जाते. आजही अंबाबाई मंदिराचे कोणतेही अनुष्ठान करताना पहिला नारळ या मंदिरात दिला जातो. कोणत्याही शूभ कार्याची पत्रिका पहिल्यांदा या मंदिरात पूर्वी देत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिराच्या देखरेखीसाठी धर्माधिकारी कुटुंबाची नियुक्ती केली होती. आता धर्माधिकारी कुटुंबाच्या सातव्या पिढीतील नचिकेत धर्माधिकारी संपूर्ण मंदिराचा कारभार पाहतात. श्रावण महिन्यात चार सोमवार आणि महाशिवरात्रीच्या काळात पाच दिवस उत्सव असतो. महाशिवरात्रीला पाच दिवस दररोज मंदिराभोवती पालखी सोहळा असतो. महाशिवरात्रीनंतर मंदिरातील चार दिवसांनी वाहनाची नगरप्रदक्षिणा असते. इतरवेळी वर्षभर दहिभाताचा नैवद्य अर्पण केला जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी लघुरूद्राभिषेक, महारूद्राभिषेक घालून नैवद्य अर्पण केला जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी सायंकाळी 7.30 पुरणपोळीचा नैवद्य अर्पण केला जातो. सोमवारी दिवसभर मात्र भाविक अभिषेक घालून दर्शन घेत फळ आणि सुक्या मेव्याचा नैवद्य अर्पण करतात. महाशिवरात्रीमध्ये पाच दिवस दुपारी साडेबारा वाजता आरती करून नैवद्य अर्पण केला जातो. आमवस्या, पोर्णिमा, प्रदोषलाही विशेष पूजा केली जाते. या सोमवारी भक्तांकडून तीळाची शिवामूठ वाहिली जाणार आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी मधुरिमा राजे छत्रपती यांच्याकडून अभिषेकही होतो.
- कपिलेश्वर मंदिरावर अभ्यासकांनी अभ्यास केला
कपिलेश्वर मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम आहे. इतिहास संकलन समितीचे राणिंगा, अॅङ प्रसन्न मालेकर यांनी या मंदिराचा अभ्यास केला आहे. अभ्यासाअंती पुस्तिका काढली असून हेमा गंगातिरकर या पुस्तिकेच्या लेखिका आहेत. या पुस्तिकेत मंदिराच्या स्थापनेपासूनचा इतिहास लिहला आहे. कपिलेश्वर मंदिर ग्रामदैवत आहे हे पन्नास टक्के लोकांना माहिती नाही. परंतू या पुस्तिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचे काम अभ्यासक करीत आहेत.
- गुरू मंत्र देणार पुत्र
कपिलेश्वर हे करवीर नगरीचे ग्रामदैवत असून भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी एक असणाऱ्या महर्षी कपिलांची तपोभूमी म्हणजे सध्याचे कपिलतीर्थ आहे. या ठिकाणी भगवान शंकरांनी केलेल्या वास्तव्याला कपिलेश्वर या नावाने ओळखले जाते. याच ठिकाणी पूर्वी कोल्हापूरची ग्रामसभा देखील होत असे. कोल्हापूर नगरीचं हे ग्रामदैवत असून स्वत:च्या मातेला गुरु मंत्र देणारा पुत्र अशी एक वेगळी ओळख कपिल आणि माता देवहुती यांची आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी भगवान कपिलेश्वराचे वाहन नगर प्रदक्षिणेसाठी निघत असते.