कपिल देव यांच्या आमंत्रणावरून राजकिय वातावरण तापलं!; ...हा कपिल देव यांच्यासह देशाचा अपमान- संजय राऊत
भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांना विश्वचषकाच्या आयोजकांनी निमंत्रित केले नाही. अंतिम सामन्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित न करून निर्लज्जपणे आयोजकांनी कपिल देव यांचा तसेच देशातील तमाम क्रिडा प्रेमींचा अपमान केला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊतांनी आपल्या भावना (X) ट्विटर या सोशल मिडीया अंकाउंटवर व्यक्त केल्या.
काल रविवारी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपल्याला अंतिम सामन्यासाठी बोलावले नसल्याची खंत व्यक्त केल्यानंतर क्रिडा क्षेत्रासह राजकिय क्षेत्रामधून विश्वचषकाच्या आयोजकांवर टिका होत आहे. एका माध्यमांशी बोलताना कपिल देव म्हणाले, "मला विश्वचषकासाठी आमंत्रित केले गेले नाही....तसेच त्यांनी मला फोनही केला नाही त्यामुळे मी अंतिम सामना पहायला गेलो नाही. अंतिम सामन्यासाठी '1983' ची विश्वविजेती टीम माझ्यासोबत हवी होती. परंतु हा एक मोठा कार्यक्रम आहे. लोक जबाबदाऱ्या हाताळण्यात इतके व्यस्त असतात, कधीकधी ते विसरतात,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
कपिल देव यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकिय नेत्यांनी आयोजकांवर टिकेची झोड उठवली. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणामागे "राजकारण" असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "आज सर्वत्र राजकारण आहे...त्यामुळे क्रिकेट कसे मागे राहील ? त्यामुळे तिथेही राजकारण सुरू होते. म्हणूनच कपिल देव यांना आमंत्रित केले गेले नाही."
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या मुद्दा अधोरेखित करताना बीसीसीआय आणि आयसीसीकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितले आहे. आपल्य़ा X वरील पोस्टमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, "भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. क्रिकेटच्या आयकॉनचा असा निर्लज्जपणे अपमान करण्यात आला आहे. हा संपुर्ण भारताचा अपमान करण्यात आहे...हि खुप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे ? बीसीसीआय, आयसीसीने कपिल देव यांना बोलावले पाहिजे होते. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली केले आहे का हे आयोजक जगाला समजावून सांगितले पाहिजे ?" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.