आठ लाख रुपये खर्चून बांधलेले कन्नड शाळेचे स्वच्छतागृह बंदच
नाहक त्रास सहन करण्याची विद्यार्थ्यांवर वेळ : अगसगे ग्रा. पं.चेही दुर्लक्ष
वार्ताहर /अगसगे
विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे या उद्देशाने सुमारे आठ लाख रुपये अनुदानातून प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारामध्ये शौचालय बांधण्यात आले आहे. शौचालयाचे काम पूर्ण होऊन देखील शौचालयाला कंत्राटदाराने टाळे ठोकून बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होऊ लागला आहे .शासनाच्या उद्योग खात्री योजनेमधून शौचालयासाठी सुमारे आठ लाख ऊपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यामधून शौचालयाची निर्मिती देखील करण्यात आली आहे. कन्नड शाळेचे जुने शौचालय काढून त्या ठिकाणी नूतन शौचालय बांधण्यात आले आहे. याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते संतोष मैत्री यांनी केला होता. सुमारे एक वर्षापासून या शौचालयाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. सध्या शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. तरीदेखील शौचालय खुले केले नाही. त्यामुळे कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शौचालय एकाच शाळेचे : विद्यार्थी सुमारे 350
कन्नड व मराठी प्राथमिक शाळेचे एकूण 350 विद्यार्थी आहेत. कन्नड व मराठी शाळा एकाच आवारात आहे. मराठी शाळेचे शौचालय आहे. याच शौचालयामध्ये सध्या कन्नड शाळेचे विद्यार्थी देखील जात आहेत. यामुळे केवळ अर्ध्या तासांमध्ये 350 विद्यार्थी कसे शौचालयाला जाऊ शकतात. शौचालयाची निगादेखील व्यवस्थित होत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
शौचालय बंद ठेवण्यामागचे गौडबंगाल काय?
शौचालयाचे काम पूर्ण झाले असले तरी कंत्राटदाराने आधार शौचालयाला टाळे ठोकून ठेवले आहे. यामागचे कारण काय, असे ग्रामपंचायत पीडिओ यांना सेफ वॉर्ड समूहाचे अध्यक्ष संतोष मैत्री यांनी विचारले असता ग्रामविकास अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. समर्पक उत्तर न मिळाल्याने संतोष मैत्री यांनी पीडीओला बुधवारी चांगलेच धारेवर धरले. केवळ तुमच्या स्वार्थासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आरोग्याशी खेळू नका. त्यांना किती त्रास होतोय ते बघा. अशा अनेक प्रश्नांचा भडिमार केला आणि शौचालयाला टाळे का ठोकले आहे? यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न केला.
कडीकोयंडा मोडून शौचालय सुरू करण्याचा इशारा
गुरुवार दि. 1 ऑगस्टपर्यंत शौचालय सुरू करावे. अन्यथा शौचालयाचे कुलूप तोडून विद्यार्थ्यांसाठी शौचालय सुरू करण्यात येईल व संबंधित कंत्राटदारावर आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दलित प्रगतीपर सेनेचे राज्याध्यक्ष शिवपुत्र मैत्री यांनी दिला आहे.