फेरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड दुराभिमान्यांना रोखले
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेल्या काळ्यादिनाच्या निषेध फेरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमान्यांनी केला. फेरी गोवावेस येथे आली असता गोगटे सर्कल येथून गोवावेसकडे येण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. परंतु, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सायकल फेरी शांततेच्या मार्गाने काढण्यात आली. कोठेही गोंधळ अथवा पोलीस प्रशासनाला त्रास न देता फेरी काढण्यात आली. परंतु, शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या फेरीमध्ये कन्नड दुराभिमान्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले रोड येथे लाल-पिवळा ध्वज लावलेला एक तरुण पोलिसांची नजर चुकवत फेरीत घुसला. तसेच कर्नाटकाच्या बाजूने घोषणा देऊ लागला. त्याचवेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तेथील पोलिसांनी त्या तरुणाला समज देऊन तेथून हाकलून लावले.
म. ए. समितीच्या सायकल फेरीला विरोध दर्शविण्यासाठी राणी चन्नम्मा चौकापासून काही कन्नड कार्यकर्ते गोवावेसकडे येण्यासाठी निघाले. परंतु, त्यांना गोगटे सर्कल येथे अडविण्यात आले. सायकल फेरीत प्रवेश करून गोंधळ माजू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांच्या वाहनातून त्यांना सुरक्षितस्थळी सोडण्यात आले. परंतु, या प्रकारामुळे पोलिसांची मात्र दमछाक झाली.