For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबीत 273 इंच पावसाची नोंद : गतवर्षीपेक्षा अधिक

10:32 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबीत 273 इंच पावसाची नोंद   गतवर्षीपेक्षा अधिक
Advertisement

6824 मि. मी. पाऊस : अगुंबेलाही मागे टाकणारा पाऊस कणकुंबी-आमगावात

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी व आमगाव गावात यावर्षी जवळपास 7 हजार मिलिमीटर पाऊस झाला आहे. कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात अद्याप 21 ऑक्टोबर पर्यंत 6824 मिलिमीटर (273 इंच)पाऊस तर आमगाव पर्जन्यमापक केंद्रात 7500 मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सध्या परतीच्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषत: जून ते सप्टेंबर असे चारच महिने पावसाळा असतो, परंतु यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झालेली असून ऑक्टोबर संपत आला तरी पावसाने उसंत घेतली नाही. त्यामुळे यावर्षीचा पावसाळा सहा महिन्यांचा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सद्यस्थितीत या भागातील भातपिके चांगली आहेत. परंतु पावसाने उघडीप दिली तर बळीराजा सुखावला जाणार आहे. अन्यथा ओल्या दुष्काळाचा परिणाम होऊन शेतकरी संकटात सापडला जाणार आहे.

Advertisement

दक्षिण भारताचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणाऱ्या कर्नाटकातील अगुंबेलाही मागे टाकणारा पाऊस कणकुंबी आणि आमगाव गावात झाला आहे. उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पाऊस खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात होत असतो. यावर्षी मे पासून ते अद्याप म्हणजे 21 ऑक्टोबरपर्यंत 6824 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यात 211.2 मि.मी, जून 1043.8 मि.मी. जुलै महिन्यात 3264.4 मि. मी, ऑगस्ट 1399.6 मि. मी., सप्टेंबर महिन्यात केवळ 318.6 मि. मी. तर ऑक्टोबर महिन्यात म्हणजे दि.21 पर्यंत 318.6 मि. मी. पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात पाच ते सहा हजार मिलिमीटर पाऊस होत असतो. यावर्षी जवळपास एक हजार मिलिमीटरचा अधिक टप्पा पावसाने गाठला आहे. यापूर्वी कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात 2019 मध्ये 8072.6 मिलिमीटर (323 इंच), 2013 मध्ये 6870 मिलिमीटर (275 इंच), 1999 मध्ये 8441.4 मि.मी. (337.6 इंच), 1994 मध्ये 8610 मिलिमीटर (344.4 इंच) पाऊस पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रामध्ये झालेली आहे.

कर्नाटकातील अगुंबे आणि कणकुंबीतील पाऊस

कर्नाटकात अगुंबे हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पाऊस कणकुंबी भागातील आमगाव येथे होतो. परंतु अगुंबे आणि कणकुंबी व आमगावची तुलना केली तर काही वर्षांत कणकुंबी येथे अगुंबेपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. अगुंबे आणि कणकुंबी येथील पावसाची सरासरी पाहिली असता सन 1994, 1999 व 2019 मध्ये अगुंबेपेक्षा जास्त पाऊस कणकुंबी व आमगाव येथे झाला आहे.

 कणकुंबीपेक्षा आमगाव गावात जास्त पावसाची नोंद

खानापूर तालुक्यातील सर्वात जास्त पाऊस आमगाव गावात होतो. म्हादई अभयारण्यात येणाऱ्या जंगलमय आमगाव गावात कर्नाटकातील सर्वाधिक पाऊस होत असतो. सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या या कणकुंबी, आमगाव, पारवाड, चिखले आणि चिगुळे गावांमध्ये दरवर्षी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. या भागातील आमगाव गावामध्ये कणकुंबीपेक्षा जास्त पाऊस होतो. एकंदरीत उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील आमगाव व कणकुंबी गावांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडणारा भाग अगुंबे, कणकुंबी की आमगाव हे शासनाला ठरवावे लागणार आहे.

पाऊस सर्वाधिक, पण पाणी धारवाड-हुबळी भागात 

उत्तर कर्नाटकातील सर्वात जास्त पाऊस कणकुंबी भागात होत असला तरी पाणी मात्र जिह्याच्या पूर्व भागातील सौंदत्ती, हुबळी, धारवाड आदी भागातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मिळते. कणकुंबीपासून खानापूरपर्यंत मलप्रभा नदीवर ठिकठिकाणी ब्रिजकम बंधारे झाले तरच येथील नागरिकांना पाण्याचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा केवळ पाऊस तेवढाच या भागात आणि पाणी मात्र पूर्व भागात, अशी परिस्थिती कायम राहणार आहे. प्रशासनाने ठिकठिकाणी लहान मोठे बंधारे निर्माण करून खानापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना पाण्याचा उपयोग घेण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

गुंजी परिसराला पावसाने झोडपले : भातपीक धोक्यात

गुंजीसह परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने अध्याप विश्रांती न घेतल्याने येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. दररोज दमदार पाऊस कोसळत असल्याने येथील शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून भातपीक धोक्यात आले आहे. त्यातच सोमवारी पहाटे आणि मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. झालेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर येथील कापणीस आलेल्या भात पिकाचेही नुकसान झाले आहे. सध्या या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांची भात पिके कापणीस आली असताना दररोज पाऊस कोसळत असल्याने येथील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडत आहे. सततच्या पावसामुळे कापणीस आलेल्या भात पिकाबरोबरच इतर पिकेही आडवी होऊन भुईसपाट झाली आहेत. शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी भरले असल्याने आडव्या पडलेल्या भातपिकांवरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे भातपिके कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.

सुगी लांबणीवर-प्राण्यांकडूनही नुकसान

ऐन सुगी हंगामात सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील सुगी हंगाम लांबणीवर पडला आहे. एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे सुगी लांबणीवर पडल्याने जंगली प्राण्यांकडूनही भात पिकाचे नुकसान होत आहे. पावसामुळे आडव्या पडलेल्या भातपिकांमध्ये चित्तळे, गवे, डुकरे, मोर, माकडे शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय, अशी मनस्थिती येथील शेतकऱ्यांची झाली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

Advertisement
Tags :

.