For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबी-पारवाड नागरिकांचा खानापूर हेस्कॉमवर मोर्चा

10:46 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबी पारवाड नागरिकांचा खानापूर हेस्कॉमवर मोर्चा
Advertisement

आठ-दहा दिवसांपासून अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांत संताप : पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्या : महिलांचा घागर मोर्चा

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

खानापूर हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कणकुंबी भागातील अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात हेस्कॉम अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली होती. परंतु त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले होते. शेवटी या भागातील पारवाड व कणकुंबी ग्रामपंचायत व्याप्तीतील चिखले, चोर्ला, मान, सडा, हुळंद, चौकी, बेटणे, गवळीवाडा (हुंदीकोप) तसेच इतर गावातील जवळजवळ 200 हून अधिक नागरिकांनी व महिलांनी डोकीवर घागर घेऊन 22 मे रोजी हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून न्याय देण्याची मागणी केली.

Advertisement

हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा आल्याचे समजताच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी ताबडतोब हेस्कॉमच्या अधिकारी कल्पना तिरवीर यांची कणकुंबी भागातील नागरिकांसह भेट घेतली. व त्यांच्याशी चर्चा करून कणकुंबी भागात विस्कळीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, या भागात वरचेवर होणाऱ्या या समस्येवर, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याबरोबर चर्चा करून, हेस्कॉम अधिकाऱ्यांची भेट घेऊन, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जांबोटी विभागाचे हेस्कॉमचेच सेक्शन अधिकारी जावेद, पारवाड ग्रा. पं. अध्यक्ष भिकाजी गावडे, कणकुंबी ग्रा. पं. अध्यक्षा दीप्ती दिलीप गवस, संजय पाटील, संजय नाईक, मंगेश नाईक, उपाध्यक्षा निलीमा महाले व सिता सुतार, सदस्य बाबाजी पाटील, शकुंतला गस्ती तसेच कणकुंबी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हेस्कॉमच्या उपअभियंत्या कल्पना तिरवीर यांनी उद्यापासून कणकुंबी भागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

कणकुंबी भागात दोनच लाईनमॅन असल्याने, दुरुस्ती करण्यास वेळ जास्त जात आहे. त्यासाठी उद्यापासून आणखी दोन अतिरिक्त लाईनमनची नेमणूक करण्याची ग्वाही देऊन जांबोटीला केईबीची गाडी उद्यापासून वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत ठेवण्यात येईल, असे सांगितले. जर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा पंचायत सदस्यांनी दिला आहे.

बेळगाव असिस्टंट कमिशनरना निवेदन

कणकुंबी भागात अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे दरवर्षी नागरिकांचे अतोनात हाल होत असून, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कणकुंबी भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्dयात विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या संदर्भात कणकुंबी ग्राम पंचायतीतर्फे बेळगाव असिस्टंट कमिशनर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर येथील हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांमुळे कणकुंबी भागातील जवळपास वीस ते पंचवीस खेड्यातील नागरिकांना दरवर्षी खंडित विद्युत पुरवठ्यामुळे आठ-आठ, पंधरा-पंधरा दिवस अंधारात रहावे लागते. वीज समस्या कायमचीच सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन कणकुंबी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा दीप्ती गवस, उपाध्यक्षा नीलिमा महाले, माजी अध्यक्ष रमेश खोरवी व मंगेश नाईक, सदस्या आरती नाईक, शकुंतला गस्ती,  सुप्रिया हरिजन व इतर सदस्यांनी बेळगाव जिल्हा असिस्टंट कमिशनरना सादर केले.

Advertisement
Tags :

.