कणकुंबी भागात साडेपाच महिन्यांत 6248 मि. मी. पावसाची नोंद
वार्ताहर/कणकुंबी
उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या कणकुंबी भागात यावर्षी अद्याप म्हणजे 27 ऑक्टोबरपर्यंत 6248.6 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. मे महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली ते ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस पडत असल्याने सहाव्या महिन्याकडे पावसाची वाटचाल सुरू आहे. पुढील पंधरा दिवस पाऊस झाला तर सहा महिन्यांचा पावसाळा होणार आहे. खानापूर तालुक्यातील कणकुंबी भाग (आमगाव, चोर्ला व हुळंद आदी गावे) उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जातो. काही वर्षांपूर्वी कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या अगुंबेपेक्षाही कणकुंबी भागातील आमगाव येथे पावसाची नोंद झाली आहे. वर्षाकाठी सरासरी सहा हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते.
कमीतकमी 5 हजार मिलिमीटर तर जास्तीत जास्त साडेसात हजार मिलिमीटर पाऊस कणकुंबी भागात होत असतो. यावर्षी अद्याप ( दि. 27 ऑक्टोबरपर्यंत) एकूण 6248.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कणकुंबी पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळे या भागातील सर्व धबधबे, नदीनाले चार-पाच महिने ओसंडून वाहत असतात. पहिल्या दोन्ही नक्षत्रात मिळून (मृग आणि आर्द्रा नक्षत्र) 1965.6 मि. मी. तर मे महिन्यात म्हणजे मान्सूनपूर्व 531.8 मि. मी. पाऊस झाला आहे. यावर्षी मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- मे महिन्यात 531.8 मि. मी., जून महिन्यात 1581.8, जुलै महिन्यात 1987 मि. मी., ऑगस्ट महिन्यात 1326 मि. मी, सप्टेंबर महिन्यात 552.8 मिलिमीटर तर ऑक्टोबर महिन्यात 269.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे यावर्षी अद्याप साडेपाच महिन्यात एकूण 6248.6 मि. मी. पावसाची नोंद कणकुंबी येथे झाली आहे.
कणकुंबीतील नदी-नाले तुडुंब
कणकुंबी भागात विशेषत: मे महिन्यात पहिल्यांदाच यावर्षी 531.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दि. 23 मे रोजी 107 मि. मी. व 24 मे रोजी 125.2 मि. मी. पाऊस झाला आहे. यापूर्वी मे महिन्यात एवढ्या प्रमाणात पाऊस अलीकडच्या काही वर्षांत तरी झाला नाही. यावर्षी गेले तीन-चार महिने कणकुंबी भागातील मलप्रभा नदीसह लहान-मोठे सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मागीलवर्षी जून महिन्यात केवळ 814.2 मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी मात्र जून महिन्यात 1581.8 मि. मी. पाऊस झाला आहे.
यावर्षी सर्वाधिक 7 हजार मि. मी. पावसाचा अंदाज
गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात अधिक पाऊस झाला आहे. तसेच यावर्षी अद्याप झालेल्या पावसापैकी दि. 15 जून सकाळी सात ते दि. 16 जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासांत 186.2 मि. मी. हा या वर्षीतील सर्वाधिक पाऊस झाला आहे. यापुढे देखील काही दिवस असाच पाऊस पडत राहिला तर यावर्षी सात हजारांचा टप्पा पूर्ण होईल, असा अंदाज आहे.